गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये कुत्ता गोळीची नशा करणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे, त्याबाबत पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई देखील केली जात आहे.
तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याने मुस्लिम संघटना आणि मालेगाव पोलीसांनी याबाबत जनजागृती करत कुत्ता गोळीपासून दूर राहा याबाबत आव्हान केलं जात आहे.
मात्र, दारूची नशा महागडी वाटत असल्याने अवघ्या दोन ते तीन रुपयांना मिळणारी कुत्ता गोळी नशेसाठी सोपी असल्याने तरुणाई आहारी गेली आहे.
मालेगाव मधील 18 ते 30 वर्ष वयोगटातील बहुतांश तरुणाई या नशेच्या आहारी गेली असून 15 गोळ्या 36 रुपयांना मिळत असल्यानं अनेक तरुणांचा या गोळीचे व्यसन लागले आहे.
कुत्ता गोळीचं खरं नाव अल्प्रलोजोम असं आहे, गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे.
मेंदूवर परिणाम करणाऱ्या या गोळ्यांच्या सेवनाने नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहतो. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र काही स्टोअर्समध्ये या गोळ्या सर्रासपणे मिळतात.
मध्य प्रदेश, गुजरात तसेच भिवंडी परिसरातून या गोळ्या आणल्या जातात. काहीजणांनी हरियाणामधून देखील गोळ्या आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
