17 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडितेचा पती हा बीड पोलीस दलात आहे. 18 मे 2022 रोजी तिचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून दिला. त्यानंतर सासरच्या मंडळीने एक महिना चांगले नांदवले. त्यानंतर पती, सासरा, सासू, भाया, जाऊ, दीर, नणंद यांनी प्लॉट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून ये म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली. 15 लाख रुपये द्या, नाही तर मुलीला पाठवू नका, असा निरोप सासरच्या मंडळींनी दिला. त्यानंतर माहेरी येवून पैसे द्यावेच लागतील असे म्हणून पतीने शिवीगाळ करत मारहाणही केली. विशेष म्हणजे ही फिर्याद देताना पीडितेने आपलं वय 17 असल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देखील 17 वर्ष नोंदवलं आहे. मग हे सर्व असताना संबंधित पोलिसांनी आणि ठाणे प्रमुखांनी बालविवाहाचा गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय.
पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी : जयंत पाटील
यासंदर्भात बालकल्याण समिती पुढे दिलेल्या जवाबातून मुलीवर अल्पवयीन वयातच लग्नाची जबाबदारी आली व इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि गर्भपात झाला, हुंड्याची मागणी झाली, मारहाण देखील केली तरी पोलीस गंभीरपणे हे प्रकरण घेत नसल्याचं बालहक्क समितीचे कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले. याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक यांना विचारले असता संबंधित प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चौकशी दरम्यान बऱ्याच गोष्टी समोर आल्या असून त्यानुसार दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं सांगितलं. याविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील संताप व्यक्त केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केले आहे.
