पतीच्या हत्येसाठी दीड लाख रुपयांची सुपारी
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीच्या खुनाची सुपारी पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिली होती. या प्रकरणात आरोपी लीना पडवळे हि गुन्ह्यातील मृत नितीन बाबासाहेब पडवळे (वय 35, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) यांची दुसरी पत्नी आहे. लीना नितीन पडवळे आणि रवी रमेश माने या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यावरून लीना हिने रमेश यास अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने नवरा मारहाण करतो. त्याला संपवून टाकूया, असं सांगितलं. दोघांनी यासाठी कट रचला आणि अमित चंद्रसेन शिंदे याला खून करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली.
त्यानंतर सर्व संशयित आरोपींनी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन कट रचला. त्यानुसार नितीन पडवळे याला 12 जानेवारी 2011 रोजी आर के नगर इथल्या खडीचा गणपती इथं बोलावून घेतले. तेव्हा अमित शिंदे याने लाकडाने डोक्यात वार करून नितीन याला जखमी केले तसंच सोन्याची चेन काढून घेतली. जखमी नितीन यास रात्री शाहूवाडी तालुक्यातील नागझरी या दुर्गम भागात नेण्यात आलं. तिथे शिंदे याने चॉपरने नितीनचे शीर धडा वेगळे केलं. याची सर्व छायाचित्रे त्यांनी रवी आणि मीना यांना पाठवली. त्यानंतर खुनासाठी वापरलेले सर्व साहित्य वारणा नदी पात्रात टाकून पुरावा नष्ट केला.
21 साक्षीदारांची तपासणी
या प्रकरणात सरकारी अभिवक्ता समीउल्ला महंमदइसक पाटील यांनी 21 साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात आठ आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तपास अधिकारी डी एस घोगरे, पोलीस पैरवी अधिकारी फारूक पिरजादे यांची सुनावणी वेळी महत्त्वाची मदत झाली.
