कुऱ्हाडीने सपासप वार करत पतीनेच २७ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या चौसा वस्ती ढाकेफळ गावात घडली आहे.
आपल्या पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी पती थेट पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर उघडकीस हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, चौसा वस्तीवर भरदुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली आहे. ज्यामध्ये पती भगवान शाहूराव थोरात याने पत्नी आरती थोरात यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून ठार केले. या नंतर पती भगवान थोरात हा स्वतः युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात पोहचला व घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी त्याला अटक करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केजचे एएसपी पंकज कुमावत यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. आरोपी पतीने नेमका खून का केला ? या मागील कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. या भीषण घटनेने परिसरात खळबळ माजली आहे
