वर्षा दीपक नागलोत (वय ३० वर्ष) असं मृत महिला प्राध्यपिकेचं नाव आहे. वर्षा या आपल्या पतीसह औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरात राहत होत्या. शुक्रवारी महाविद्यालयातून ड्युटीवरून घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या बेडरुममध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मिळताच वर्षा यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं. परंतू तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. वर्षा या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून त्यांना सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप मयत वर्षा यांच्या नातेवाईकांनी केला आहे
दरम्यान, या घटनेनंतर शहरातील पुंडलिकनगर पोलीसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.
याशिवाय सिडको परिसरात एकामागून एक दोन तरुणांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता एका महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेनंच आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
