शहरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडितेला चाळीसगावला बोलावले
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ही सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्याला आहे. 7 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता नितू ऊर्फ जोया राजू बागडे, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार यांनी पीडितेला चाळीसगाव येथे बोलावले. पीडिता चाळीसगावला पोहोचल्यानंतर आरोपींनी तिला शितपेयातून गुंगीचं औषध पाजलं. तिला वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडलं. त्यानंतर आरोपींनी पीडितेला तिच्या घरी पाठवलं. पुन्हा दहा फेब्रुवारी रोजी आरोपी या मुलीला चाळीसगावला घेऊन गेले. तिथे त्यांनी 23 फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री या मुलीला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले.
पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलगी आणि आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरोधात तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
