आर्थिकृष्ट्या सक्षम असूनही मोफतचं रेशन घेणाऱ्यांसाठी सावधान करणारी एक बातमी आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही मोफत रेशन घेत असाल तर आताच तुमचं रेशन कार्ड रद्द करा. नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
नवा सरकारी नियम काय?
जर रेशन कार्डधारकाने स्वत:च्या उत्पन्नातून 100 वर्गमीटरचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर खरेदी केली असेल, त्याच्याकडे चार चाकी गाडी, ट्रॅक्टर असेल, शस्त्राचं लायसन्स असेल, गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखाहून अधिक पगार असेल अशा लोकांना त्यांचं रेशन कार्ड तहसील किंवा डीएसओ कार्यालयात सरेंडर करावं लागणार आहे. या चार गोष्टींपैकी एका जरी गोष्टीत दोषी आढळल्यास रेशन कार्डधारकाचे रेशन कार्ड तर रद्द होईलच पण त्याच्यावर कारवाईही केली जाणार आहे.
कायदेशीर कारवाई होणार
नव्या सरकारी नियमानुसार जर रेशन कार्डधारकाने स्वत:हून कार्ड सरेंडर केलं नाही तर चौकशीनंतर त्याचं कार्ड रद्द केलं जाईल. तसेच त्याच्या कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर जेव्हापासून हे लोक रेशन घेत आहेत, तेव्हापासूनची त्यांच्याकडून भरपाईही केली जाणार आहे.
केंद्र सरकारने अत्यंत कडक नियम केले आहेत. त्यामुळे रेशन कार्डधारकांनी या नियमांचं पालन केलं पाहिजे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे. त्यांनी मोफतमध्ये रेशन घेऊ नये. रेशनिंग व्यवस्था ही गोरगरीबांसाठी आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी रेशन कार्ड रद्द केलं तर त्याचा फायदा इतर गरीबांना होणार आहे, असं सांगितलं जात आहे.
