जळगाव जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नकली नोटा चलनात आल्या असून पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी बनावट नोटा पकडल्या होत्या. दरम्यान बुधवारी चोपडा उपविभागीय कार्यालयातील पोलिस नाईक राहुल बैसाने यांना एक व्यक्ती बनावट नोटांचा छपाई करून विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती. बैसाने यांनी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना कळविले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलिस कर्मचारी महेश महाले, रवींद्र मोतीराया, नीलेश पाटील, सचिन साळुंखे, सुहास पाटील, राहुल बैसाने, रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील यांचे पथक तयार केले.
पथकाने सापळा रचून नोटा छपाई करणारा कुसूंबा येथील देविदास पुंडलिक आढाव (वय ३१) याला बोलाविले. ५० हजारात दीड लाखांच्या बनावट नोटा देण्याचा हिशोब ठरला होता. पोलिसांनी त्याला तीन लाखांच्या नोटांची मागणी केली. आढाव याला संशय आल्याने अगोदर त्याने पोलिसांना चकवा दिला. सुमारे तीन तास पोलिसांना चकवा दिल्यावर त्याने गावाबाहेर एका टेकडीवर बोलाविले. आढाव दुचाकी घेऊन त्याठिकाणी उभा होता. पथकातील दोन कर्मचारी अगोदर पुढे गेले आणि त्यांनी त्याच्याकडून नोटा पाहून त्याला ताब्यात घेतले. तसेच लपलेले इतर कर्मचारी देखील तिथे पोहचले. पथकाने आढाव यांच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा व त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले.
