नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाट हा नागमोडी वळणाचा आणि तीव्र उताराचा आहे. आज दि.२३ रोजी वावी ता.धडगाव येथून घराची कौले घेण्यासाठी चांदसैली मार्गे वेलदा ता.निझर या ठिकाणी पिकअप व्हॅन जात होती. दुपारी चांदसैली घाटातील तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप तीन वेळा पलटी होवून खोल दरीत कोसळली. या अपघातात पिकअपचा चक्काचूर झाला असून त्यातील चार जण जागीच ठार झाले आहेत तर दोेन जण गंभीर जखमी झाले आहेत
घटनास्थळी मदतकार्य सुरू असून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमीना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चौघा मयतांपैकी तीन जण वावी ता.धडगाव व एक जण बोधला ता.धडगाव येथील आहेत. तसेच दोन जखमी वावी येथील आहेत.
मयतांमध्ये चालक तुकाराम दिवल्या ठाकरे (वय ३५ रा.वावी), विरसिंग रमेश पावरा (वय ३५,रा.बोधला), मुकेश कैला ठाकरे (वय २५ रा.वावी), अमरसिंग शंकर ठाकरे (वय ३०, रा.वावी) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सुरुपसिंग साकर्या ठाकरे (वय २०, रा.वावी), गणेश साकर्या ठाकरे (वय १५, रा.वावी) यांचा समावेश आहे.
मयतांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याशी जोडणारा आणि कमी अंतराचा मार्ग चांदसैली घाट आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या घाटातून प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दूरवस्था झाली आहे.
