तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्याचा भावाने प्रेमप्रकरणातून उपनगर हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा उपनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात तक्रारदाराच्या भावास अटक झाली होती. त्यानंतर सध्या तो जामीनावर सुटलेला आहे. तर, लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक सागर डगळे हा या गुन्ह्याचा तपास करीत आहे.सदरील गुन्ह्याचे चार्जशीट दाखल करताना त्यात मदत करण्याच्या मोबदल्यात लाचखोर डगळे याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोड होऊन १० हजार रुपये देण्याचे ठरले. डगळे याने यापूर्वीही तक्रारदाराकडून तीन वेळा ऑनलाईन पैसे घेतलेले होते.दरम्यान, तक्रारदाराने यासंदर्भात मंगळवारी (ता. २) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानुसार लाचखोर डगळे यास बुधवारी (ता. ३) लाचेची ७ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सदरची कारवाई जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली
सतत ठिकाणं बदललीलाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदाराने लाचखोर सहायक निरीक्षक डगळे यास संपर्क साधला असता, त्याने बुधवारी (ता. ३) सकाळी उपनगर रेल्वे स्टेशन येथे बोलाविले. तक्रारदार त्याठिकाणी गेला असता, लाचखोर ढगळे तिथे नव्हता. परत संपर्क साधला असता, डगळे याने तक्रारदारास रेल्वे स्टेशन परिसरात बोलाविले. पुन्हा तक्रारदार नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात गेला. या दोन्ही ठिकाणी लाचखोर डगळे आलाच नाही. त्यामुळे दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचीही धावपळ झाली. तक्रारदाराने पुन्हा तिसऱ्यांदा संपर्क साधला असता, डगळे याने त्यास त्र्यंबकरोडवरील जिल्हा रुग्णालयात येण्यास सांगितले. तक्रारदार या ठिकाणी आला. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दबा धरून सापळा रचला. डगळे हा जिल्हा रुग्णालयात सरकारी गणवेशात आला. तक्रारदाराने त्यास आवाज दिला. त्यानंतर दोघे भेटले आणि तक्रारदाराकडून डगळे याने लाचेची ७ हजारांची रक्कम स्वीकारताच दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डगले यास घेराव घातला. सर्वप्रथम डगळे याच्या कंबरेला असलेली पिस्तुल पथकाने काढून घेतल्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयातील एका कक्षेत नेले. त्याठिकाणी प्राथमिक चौकशी केल्यानंतर कॅनडा कॉर्नरवरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले
