पब्जी हा अत्यंत लोकप्रिय व्हिडीओ गेम आहे. हा गेम ऑनलाईन असल्यामुळे एकाच वेळी अनेक जण खेळू शकतात. त्यामुळे हा गेम खेळताना अनेक अज्ञात लोकांशी तुमची मैत्री होते. पब्जी खेळताना लोकं एकमेकांच्या प्रेमात पडली अन् त्यांनी लग्न केलं अशीही काही प्रकरणं समोर आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आणखी एक पार चक्रावून टाकणारं प्रकरण समोर आलंय. एक पाकिस्तानी महिला आपल्या ३ मुलांना घेऊन भारतात आलीये. पब्जी खेळत असताना ती एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली. अन् त्याला भेटायला ती थेट भारतात आली. कोणी ओळखू नये म्हणून ती हिंदू पेहराव करत असे. पण अखेर तिचं बिंग फुटलं. अन् आता ती युपी पोलिसांच्या ताब्यात असून तिची आणखी चौकशी केली जात आहे.
ही घटना ग्रेटर नोएडा येथील रबुपूरा या ठिकाणी घडली आहे. २०२० साली पब्जी खेळत असताना सचिन नावाचा एक तरुण पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला होता. गेम खेळता खेळता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मग संधी मिळताच ती महिला पाकिस्तान सोडून भारतात सचिन जवळ राहण्यास आली. गेले २ वर्ष ते रबुपूरा येथील आंबेडकरनगर या ठिकाणी भाड्याच्या खोलीमध्ये राहात होते. कोणी ओळखू नये म्हणून तिने स्वत:चं नाव बदलून सीमा असं केलं. सोबतच ती हिंदू महिलांसारखा पोशाख करू लागली. ती सचिनच्या नावाचं मंगळसूत्र देखील घालत होती. याच दरम्यान शेजाऱ्यांना तिच्यावर संशय आला. अन् त्यांनी या प्रकरणी पोलीस तक्रार केली. पण पोलीस चौकशी करायला येण्याआधीच ते दोघं पळून गेले.
पोलीस या दोघांची कसून चौकशी करत होते. दरम्यान मथुरा येथील पानी गावांत ते दोघं पकडले गेले. त्यांच्यासोबत आणखी ४ मुलं सुद्धा होती. या महिलेवर ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप आहे. ती आपल्या देशाची माहिती पाकिस्तानात पाठवत असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची आणखी चौकशी केली जात आहे. या प्रकरणात आणखी काही नावं समोर येथील असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
