केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, 'मला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण आलेले नाही. निमंत्रण आले तर मी जाणार आहे. मी बुद्धिस्ट आहे . पण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्मांचा आदर करण्याचे सांगितले आहे.
अनेक गावांमध्ये मला मंदिरामध्ये बोलावतात. आम्ही देखील बुद्ध विहारांमध्ये इतर जाती धर्माच्या लोकांना बोलावतो. राम मंदिर हा भाजपचा विषय नाही, राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर हा धर्मकारणाचा विषय आहे, असेही ते पुढे म्हणाले.
कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यावरही आठवले यांनी भाष्य केलं. 'सिताराम येचुरी कम्युनिस्ट आहेत. कम्युनिस्ट कोणताही धर्म मानत नाहीत. मात्र, सिताराम येचुरी हिंदू आहेत. आता त्यांना निमंत्रण आले आहे, त्यांनी ठरवावं जायचे की नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून कोणीही राजकारण करू नये. त्यांना निमंत्रण मिळालं , त्यांनी जावं, असं आठवले म्हणाले.
मराठा आरक्षणावर आठवले काय म्हणाले?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'तामिळनाडूच्या धर्तीवर मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे मी सुचवले आहे. ओबीसीची वेगळी कॅटेगिरी करून त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावे. त्यामुळे सध्याचे ओबीसीचे आरक्षण कमी होणार नाही. मराठा आरक्षण म्हणजे सर्व मराठ्यांना आरक्षण नाही, तर ते गरीब मराठ्यांसाठीच आरक्षण आहे.
