निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी पाठलाग करून वाहनासह सुमारे दहा लाखांचा मद्यसाठा पकडला. शनिवारी (ता. ६) ही कारवाई केली.
नंदुरबारकडून दहिवेलमार्गे पांढऱ्या रंगाच्या बोलेरोतून मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती निजामपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हनुमंत गायकवाड यांना मिळाली.
या महितीच्या आधारे निजामपूर पोलिसांनी सापळा रचला. संशयित पांढऱ्या रंगाचे बोलेरो (एमपी ०९, बीसी ३१२५) वाहन छडवेल रस्त्याने जात असताना पोलिस पथकाने पाठलाग केला.
पोलिस पाठलाग करीत असल्याचे पाहून बोलेरोचालकाने गाडी कच्च्या रस्त्याने पळविली. धवळीविहीर गावाजवळ चालक गाडी सोडून फरारी झाला. बोलेरो गाडीच्या तपासणीत गाडीमध्ये मद्याचा साठा आढळला. वाहनासह सुमारे दहा लाखांचा मद्यसाठा जप्त केला.