१५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत सदस्यास अटक करण्यात आली आहे. शाळा सुशोभीकरणाच्या कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतली.
येवला : शाळा सुशोभीकरणाच्या कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येवला तालुक्यातील चिचोंडी येथे ही कारवाई करण्यात आली. रामनाथ उमाजी देवडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षांनी याबाबत तक्रार केली होती. बदापूर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी पीएम श्री योजनेतून सात लाख ३० हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधीतून शाळेच्या सुशोभीकरणासह परसबागेचे काम सुरू करण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्य या नात्याने संबंधित कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात रामनाथ उमाजी देवडे याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १५ हजार रुपये करण्यात आली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देण्यात आली. त्यानुसार सापळा रचून १५ हजार रुपये स्वीकारताना ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे यास अटक करण्यात आली.
