येथील दी शिरपूर मर्चंट बँकेतील ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी संतप्त ठेवीदारांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी बँकेचे शटर ओढून घेत कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. संबंधित ठेवीदार दुपारनंतर निघून गेले. नंतर बँकेतील कामकाज पूर्ववत झाले.
दरम्यान, मागील संचालक मंडळाने बेकायदेशीर बेसुमार कर्ज वाटप केल्यामुळे बँकेवर ही वेळ ओढवली असल्याचा आरोप बँकेचे अध्यक्ष डॉ. मनोज महाजन यांनी केला.
मर्चंट बँकेची गंगाजळी आटल्याने पैसे काढण्यासाठी आलेल्या ठेवीदारांना काही दिवस थांबण्याचे आवाहन बँकेतर्फे सातत्याने केले जात आहे. मात्र, रोज ठेवीदार येऊन ठेवींची मागणी करीत आहेत. मंगळवारीदेखील भरणा असलेले ठेवीदार बँकेत पोचले.
बँकेतर्फे बाहेर फलक लावून वसुलीची रक्कम जमा झाल्यानंतर ठेवी परत केल्या जातील, असे जाहीर करण्यात आले आहे. व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांनी ठेवीदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, व्यवस्थापनाने पैसे देण्याची तारीख सांगावी, असा आग्रह महिलांनी धरला. तसे आश्वासन देणे शक्य नसल्याचे व्यवस्थापकांनी सांगताच वादावादीला सुरवात झाली.
...अन् कर्मचाऱ्यांना डांबले
संतप्त महिलांनी प्रवेशद्वाराजवळ जात बँकेचे शटर ओढून घेत कर्मचाऱ्यांना आत डांबले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर गेलेले कर्मचारी बाहेरच, तर अन्य बँकेतच अडकून पडले. काही वेळानंतर ठेवीदार महिला घरी निघून गेल्या.
नंतर कर्मचाऱ्यांनी शटर उघडून पुन्हा नियमित कामकाजाला सुरवात केली. हा प्रकार रोजचाच असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. बँकेतर्फे कर्जवसुली सुरू असून, त्याआधारे नियमित खातेदारांचे व अंशतः ठेवीदारांचे व्यवहार सुरू ठेवले आहेत.
तथापि एकाच वेळी मोठ्या संख्येने ठेवीदार येऊन मोठ्या रकमांची मागणी करीत असतील तर प्रत्येकाचे समाधान करणे शक्य होणार नाही, त्यामुळे ठेवीदारांनी संयमाची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त केली
"कामानिमित्त बाहेरगावी गेलो असता, बँकेबाबत हा प्रकार घडला. बँकेची सूत्रे स्वीकारून जेमतेम महिना झाला आहे. मागील संचालक मंडळाने बेसुमार आणि बेकायदेशीर कर्ज वाटप करून बँकेची अवस्था वाईट केली.
मागील सात वर्षांत कोणतीच कर्जवसुली केली नाही. त्यामुळे ही वेळ ओढवली आहे. सध्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून स्पेशल ऑडिट सुरू आहे. आमचे वसुलीचे प्रयत्नही सुरू आहेत. ठेवीदारांची निकड मान्य असली तरी बँकेची स्थिती समजून घेणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहकार्यानेच बँक लवकर सुस्थितीत आणणे शक्य होणार आहे."- डॉ. मनोज महाजन, अध्यक्ष, मर्चंट बँक
