उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका नववधूची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली. घटना रविवारची आहे. सायंकाळी उशिरा प्रियकराने आपल्या प्रेयसीला ब्युटी पार्लरमध्ये वधू बनल्याचं पाहिल्यानंतर त्याचा संयम सुटला. मध्य प्रदेशातील सोनागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रेयसीचा पाठलाग केल्यानंतर त्याने झाशी येथील ब्युटी पार्लरमध्ये तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. वधूला तात्काळ रुग्णालयात नेलं. मात्र, तिचा मृत्यू झाला.
प्रियकर आणि तरुणी दोघेही मध्य प्रदेशातील सोनगिरी पोलीस स्टेशन हद्दीतील वरगाये गावचे रहिवासी होते. हत्येतील आरोपी प्रियकर दीपक अहिरवार याचे काजल नावाच्या तरुणीसोबत बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकर दीपकला काजल आपल्यापासून दूर जाऊ लागल्याचं जाणवलं. दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. दरम्यान, काजलचं लग्न झाशीतील तिच्या कुटुंबीयांनी दुसरीकडेच ठरवलं.
रविवारी 23 जून रोजी काजलचं लग्न होणार होतं. काजल ही मेकअप करण्यासाठी सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयटीआयजवळील ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. काजलचं लग्न झाशीत ठरलं असल्याची माहिती तिचा प्रियकर दीपकला मिळाली. प्रियकर दीपक काजलचा पाठलाग करत झाशीला गेला
काजल ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर तिचा पाठलाग करणाऱ्या दीपकने अतिशय धक्कादायक कृत्य केलं. त्याने पार्लरमध्ये बसलेल्या त्याच्या प्रेयसीला गोळ्या घालून ठार मारलं. यानंतर तो बंदूक घेऊन पळून गेला. एसएसपी राजेश एस यांनी म्हटलं, की मुलीवर गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. या घटनेनंतर लग्नघरात शोककळा पसरली आहे. आता ज्या घरातून वरात काढायची होती तिथे नवरीवरच अंत्यसंस्कार होणार आहेत.
