या माहितीच्या अनुषंगाने दक्षता पथकातील उपनिबंधक (शिधावाटप) मधुकर बोडके, प्रभारी सहाय्यक नियंत्रक विनायक निकम, निरीक्षक प्रकाश पराते, राजीव भेले, सुधीर गव्हाणे, दीपक कदम, विवेक त्रिभुवन, मच्छिंद्र कुठे, सागर वराळे, संदीप दुबे, अमित पाटील, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, मंडळ अधिकारी रोहित झोडगे, तलाठी सोमनाथ कोकणी यांच्यासह साक्री पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक राजू जाधव, रामलाल अहिरे, प्रमोद जाधव, मंगेश खैरनार आदी हॉटेल खालसा पंजाब येथे गेले असता त्यांना टँकर (क्रमांक जी.जे.१६ ए.वाय. ५६१८) हा नायरा एनर्जी लि खंबालिया पो. बॉक्स नंबर २४ जिल्हा देवभूमी, गुजरात मधून ३५ हजार लिटर डिझेलचा भरणा करून आर. के. ट्रान्स्पोर्ट अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड रायपूर छत्तीसगड या ठिकाणी डिझेल खाली करण्यासाठी रवाना झाला होता.
हा टँकर वर नमूद ठिकाणी पार्किंगमध्ये उभा होता. त्यातून डिझेलची चोरी करताना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तसेच टँकर (क्रमांक जी.जे.०१, ए. वाय. ५६४२) हादेखील डिझेल चोरीच्या उद्देशाने थांबला होता. तसेच टाटा ९०९ ईएक्स (क्रमांक एम.एच.०४ डी.एस.०७४९) चे मालक हे डिझेलची अनधिकृत चोरी, साठवणूक व विक्री करीत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत साक्री पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कलम अन्वये गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी करत आहेत.
टँकरचालकांसह मालकही आरोपी
डिझेल चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पथकाने या ठिकाणाहून एकूण एक कोटी, नऊ लाख, तीस हजार, ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच वाहन चालक नरेंद्र लालमनी, वाहन चालक राजीव बच्चुलाल गांधी (गुप्ता), हॉटेल खालसा पंजाब मालक चमकोर सुखपाल सिंग यांना ताब्यात घेतले आहे. तर टँकर क्रमांक (जी जे. १६, ए.वाय. ५६१८) चे मालक, जी.जे. ०१, डी.व्ही. ५६४२ चे मालक व टाटा ९०९ ईएक्स एम.एच. ०४, डी.एस. ०७४९ चे मालक यांनाही गुन्ह्यात आरोपी केले आहे.
