सासरे नोकरीतून रिटायर झाल्यानंतर त्यानिमित्त ठेवलेल्या पार्टीसाठी घरी आलेल्या एका पाहुण्याने कालांतराने घरातील सुनेच्या आयुष्याची वाताहत केल्याची घटना चुरू येथे घडली आहे. चुरु येथील पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. घरातल्या 28 वर्षांच्या सुनेला तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने आपल्याकडून अडीच लाख रुपये उकळल्याचा आरोपही या प्रकरणात सुनेकडून करण्यात आला आहे. सध्या आरोपी तिला सतत ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार करत आहे.
2017 मध्ये या तरुणीचं लग्न झालं. त्यानंतर सासऱ्यांच्या रिटायरमेंटनिमित्त झालेल्या पार्टीत तिची एका पाहुण्याशी ओळख झाली आणि त्यानंतर तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पोलीस स्टेशनमधील महिला अधिकारी करतार सिंह म्हणाल्या, पीडित महिलेने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. राजकीय भरतिया रुग्णालयात महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिचा जबाब नोंदवून योग्य ती कारवाई केल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केलं. 2017 मध्ये झुंझुनू येथील एका व्यक्तीशी तिचा फेसबुकवरुन परिचय झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी दिल्लीतील आर्य समाज येथे जाऊन तिने त्याच्याशी प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली आहे
प्रेमविवाहानंतर तिचे सासरे जेव्हा नोकरीतून रिटायर झाले तेव्हा तिची ओळख कपिल कस्वा नावाच्या एका व्यक्तीशी झाली. त्याच्याशी तिचं मोबाइलवर बोलणंही होऊ लागलं. आपला नवरा दारु पिऊन मारहाण करत असल्यामुळे कपिलशी जवळीक वाढल्याचं तिने सांगितलं. याच जवळीकीतून कपिलने तिला आपल्या शेतात बोलवलं. कोल्ड्रिंक पाजलं. मात्र त्यात गुंगीचं औषध असल्यामुळे ते पिताच तिची शुद्ध हरपली. या परिस्थितीचा फायदा घेऊन कपिलने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यावेळी फोटो आणि व्हिडिओ तयार केले. हेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कपिल सातत्याने तिच्यावर बलात्कार करत राहिला. कपिलमुळेच या महिलेने आपल्या पतीचं घर सोडलं आणि चुरुमध्ये राहू लागली. कपिलने तिथल्या एका एनजीओमध्ये तिला नोकरीला लावलं. त्यानंतर अनेकदा तिला झुंझुनू येथे बोलवून किंवा तिच्या ऑफिसमध्ये जाऊनही तो तिच्यावर बलात्कार करत राहिला असं सांगण्यात आलं आहे. सध्या कपिल कस्वा याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
