आग्रा येथील एका व्यावसायिकाचे एक कोटी रुपयांचे हिरे चोरीला गेल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले. दरम्यान, पुष्प विहार परिसरातील सेक्टर-4 मध्ये पोलिसांना एक संशयित महिला दिसली असता पोलिसांनी त्या महिलेला रोखलं. पोलिसांनी तिच्या बॅगची झडती घेतली असता तिच्याकडे हिऱ्यांचे दागिने सापडले. महिलेच्या माहितीवरून पोलिसांनी तिचा साथीदार कुणाल याला अटक केली.
महिलेनं सांगितलं की, तिने टोळीतील इतर सदस्यांसोबत 15 जून रोजी आग्रा येथील लोहामंडी परिसरात एका व्यावसायिकाच्या कारमधून एक कोटीचे हिरे आणि एक लाख रुपयांचा लॅपटॉप चोरला होता. महिलेच्या अटकेनंतर आग्रा पोलिसांनी या टोळीतील नऊ गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून पाच हिऱ्यांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
आग्रा येथे पकडलेला पवन उर्फ मुत्तू हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सर्व आरोपी दक्षिण दिल्लीचे रहिवासी आहेत. टोळीतील इतर आरोपींमध्ये मुनियप्पा, अविनाश, विकास, सगदेव, अरुण आणि लक्ष्मी यांचा समावेश आहे.
15 जूनच्या रात्री आग्रा येथील मदीया कटरा चौकातून दोन तरुणांनी प्रकाश डायमंड कॉर्पोरेशनचे मालक नितीन मेहरोत्रा यांच्या कारमधून बॅग चोरी केली. बॅगेत करोडो रुपयांचे हिरे आणि दागिने होते. बॅगेत एक लाख रुपये रोख आणि लॅपटॉपही होता. चोरी करून चोरट्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली.
दरम्यान, गेल्या सोमवारी दिल्ली पोलिसांनी या टोळीतील महिला सदस्य गीता आणि कुणाल यांना अटक केली होती. त्यांच्याकडून हिरे आणि दागिनेही जप्त केले होते. दिल्ली पोलिसांनंतर आग्रा पोलिसांनी या टोळीशी संबंधित आणखी 9 गुन्हेगारांना अटक केली. या घटनेतील चोरीला गेलेला लॅपटॉप आणि चार्जर पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडून काही हिऱ्यांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींकडून 4.83 ग्रॅम वजनाचे पाच हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
