अनैतिक संबंध लपविण्यासाठी एका इसमानं आपली घटस्फोटित प्रेयसी आणि तिच्या 15 वर्षांच्या आणि आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. डेहराडून इथल्या या तिहेरी हत्याकांडाची पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. अनैतिक संबंधांतून हे तिहेरी हत्याकांड घडलं आहे. आरोपी उत्तर प्रदेशातला राहणारा असून, विवाहित आहे आणि दोन मुलांचा पिता आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून हत्येशी संबंधित साहित्य ताब्यात घेतलं आहे. तिन्ही मृत आणि आरोपी एकाच गावातले रहिवासी आहेत. तिन्ही मृतदेह ताब्यात घेण्यासाठी महिलेच्या बहिणीला आणि भावाला पोलिसांनी डेहराडून इथं बोलावून घेतलं आहे.
डेहराडून इथं मंगळवारी संध्याकाळी बडोवाला परिसरात डीएसपी चौकाजवळ कोरड्या नाल्यात कचऱ्यामध्ये दोन मुलींचे मृतदेह सापडले. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली तेव्हा त्या जागेपासून जवळपास 100 मीटर अंतरावर एका महिलेचा मृतदेह कचऱ्यात फेकलेला आढळला. मृतदेहाजवळ दोन बॅग मिळाल्या आहेत. त्यात कपडे, आर्टिफिशिअल ज्वेलरी आणि रोजच्या वापराच्या काही वस्तू सापडल्या आहेत. या ठिकाणी कोणीही सामान्य माणूस सहजी पोहोचू शकत नव्हता.
पोलिसांनी तपास केल्यावर आढळलं, की ती मृत महिला आणि अन्य दोन मृतदेह हे तिच्याच मुलींचे आहेत. आसपासच्या परिसरात पोलिसांनी तपास केल्यावर तिथल्या फर्निचरच्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली.
एसएसपी अजय सिंह यांनी सांगितलं की, तपासात फॅक्टरीमध्ये एक कर्मचारी आढळला आहे. हसीन (वय 36, रा. सध्या ब्रह्मपुरी पटेलनगर) असं त्याचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीच्या चौकशीमध्येच हत्याकांडाची माहिती उघड झाली.
हसीन आणि घटस्फोटित महिला रेश्मा हे एकाच गावात राहणारे होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. रेश्मा हिला आधीपासून 15 वर्षांची आयत नावाची मुलगी होती. हसीनच्या संपर्कात आल्यावर आठ महिन्यांपूर्वी तिनं आणखी एका मुलीला जन्म दिला. लहान मुलीच्या जन्मानंतर तिला स्वतःचं घर सोडून हसीन याच्याबरोबर राहायचं होतं; मात्र हसीनचा याला विरोध होता. हसीन याची पत्नीही गावी राहत होती. तरीही, रेश्मा आरोपी हसीन याच्याबरोबर राहण्यासाठी डेहराडून इथं आली.
डेहराडूनमध्ये हसीनला न कळवताच रेश्मा दाखल झाली. तिथं आयएसबीटीमधून तिने हसीनला फोन केला. तो तिला घेण्यासाठी बाइकवरून आला. प्रेयसीला आणि दोन्ही मुलींना गाडीवरून घेऊन तो पावणेअकराच्या सुमारास तो आपल्या फॅक्टरीत आला. 23 जून रोजी फॅक्टरीच्या बाहेरच्या शेडमध्ये तिने प्रेयसी आणि तिच्या मुलींना आणलं. मुलींना पिण्यासाठी दूध दिलं. रात्री जवळपास एक ते दोनच्या दरम्यान त्यांनं आधी रेश्माची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या दोन्ही मुलींनाही तोंड दाबून मारून टाकलं. तिन्ही मृतदेह त्यानं फॅक्टरीच्या मागे कचऱ्यात लपवले.
रोडवेज बसचं तिकीट आणि तपासाला गती
सीओ अनिल जोशी यांनी सांगितलं, की घटनास्थळी फॅक्टरी परिसरात रोडवेज बसचं एक तिकीट मिळालं. 23 जूनच्या संध्याकाळी नहटौर येथून डेहराडून इथं एक प्रौढ व्यक्ती आणि लहान मूल असं ते तिकीट होतं. त्याबरोबर एक कॅरीबॅगही मिळाली. तशाच बॅग फॅक्टरीमध्ये सुद्धा होत्या. तेव्हा पोलिसांनी सगळ्या कामगारांची कसून चौकशी केली, तेव्हा प्रकरण उघडकीस आलं. हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या टीमला डीजीपी यांच्याकडून प्रशस्तिपत्र देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच आयजी गढवाल रेंज यांनी 25 हजार रुपये रोख बक्षिसाची घोषणा केली.
