अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध, कुटुंबाने लावलं लग्न; पुढे घडलं भयानक.. पतीसह 10 लोकांवर गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
अल्पवयीन गर्भवती मातेच्या मृत्यू प्रकरणात मोखाडा पोलीस ठाण्यात पतीसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जव्हारमध्ये एका अल्पवयीन गरोदर मातेच्या मृत्यू प्रकरणात तिच्या पतीसह 10 जणांविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मोखाडा पोलिसांनी मयत अल्पवयीन मातेच्या आई-वडील, सासू-सासरे लग्न लावणारा भटजी, आचारी, मंडप डेकोरेटर आणि पती अशा तब्बल 10 जणांवर सुमोटो गुन्हा दाखल केला आहे.
मोखाडा तालुक्यातील एका कातकरी समाजातील अल्पवयीन युवतीचं जव्हार तालुक्यातील नेहाळे येथील 21 वर्षीय जयेश रामदास मिसाळ याच्याशी मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून ती गरोदर राहिल्याने अल्पवयीन असताना देखील तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. अखेर 6 जून रोजी या अल्पवयीन गर्भवतीला वेदना होऊ लागल्याने तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात पतीसह मोखाडा पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पती जयेश मिसाळ याला पोलिसांनी अटक करत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
पालघरच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी बहुल भागात आजही मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असून यावर आळा घालण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती तसच कारवाई करताना दिसून येते. मात्र, असं असताना देखील आजही या भागात बालविवाह प्रमाण अधिक असल्याने याचा परिणाम थेट बालमृत्यू, माता मृत्यू आणि या भागातील बालकांच्या वाढत्या कुपोषणावर झालेला पाहायला मिळतोय. या आधी देखील जिल्हा प्रशासनाकडून बालविवाह विरोधात कठोर पावलं उचलली गेली असली तरी देखील स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही या भागात बालविवाहांचे प्रमाण जैसे थेच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक पातळीवरील सामाजिक संस्थांना हाताशी धरून या भागात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default