भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या भावाच्या पत्नीला आईचा आणि भावाच्या पत्नीला मुलीचा दर्जा दिला जातो. त्यांचा आदर केला जातो; मात्र काही जण अशा नात्यांना काळिमा फासतात. त्यांच्या विकृत वागणुकीमुळे एखाद्या स्त्रीचा संसार मोडू शकतो. उत्तर प्रदेशातल्या हापूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका स्त्रीच्या पतीचा मोठा भाऊ तिच्याशी गैरवर्तन करत होता. तिने आपल्या पतीकडे याबाबत तक्रारदेखील केली; पण पतीने तिला पाठिंबा देण्याऐवजी भावाची बाजू घेतली आणि तिला घरातून हाकलून दिलं. इतकंच नाही, तर त्याने तिला तिहेरी तलाकदेखील दिला.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, हापूरमधल्या बाबूगडमधल्या एका गावात ही घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या एका विवाहितेला तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक दिला. कारण, तिने आपल्या पतीच्या भावाच्या वाईट वर्तणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. पतीने तिला मदत करून न्याय मिळवून देण्याऐवजी तिला तिहेरी तलाक दिला. त्यानंतर पीडितेने आई-वडिलांच्या घरी जाऊन त्यांना सगळा प्रकार सांगितला. तिच्या आई-वडिलांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिचा पती, पतीचा भाऊ आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं. तिच्या पतीच्या भावाचा सुरुवातीपासून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता. तिचा पती घरातून बाहेर पडताच तो तिच्याकडे येऊन तिला वाईट हेतूने स्पर्श करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत तिने पती आणि सासरच्या मंडळींकडे तक्रार केली होती; मात्र त्यांनी तिला मारहाण केली. शिवाय, त्यानंतर पतीने तिला तिहेरी तलाक देऊन घरातून हाकलून दिलं. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
