शिरपूर (प्रतिनिधी) :
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. भूषण आर. गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)तर्फे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी शिरपूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
भारताच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख असलेल्या मा. न्यायमूर्ती भूषण गवई साहेब न्यायदानाचे पवित्र कार्य पार पाडत असताना अॅड. राकेश किशोर तिवारी या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकाराने संपूर्ण देशातील लोकशाही व न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न झाल्याचा निषेध निवेदनातून करण्यात आला.
हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर, तसेच एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक बहुजन समाजावर झालेला हल्ला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) शिरपूर तालुका अध्यक्ष मा. व्यंकटेश हिरालाल पाटील, शिरपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दिलीप भाईदास पाटिल, शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. युवराज ठोंबरे, अॅड. रोहित पाटोळे, समता प्रतिष्ठान अध्यक्ष भटु पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ वाडीले तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
