विखरण / प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील विखरण येथे नुकताच नवीन आठवडे बाजार सुरू करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांचा या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांसाठी हा बाजार मोठा सोयीचा ठरत आहे.
नवीन सुरू झालेल्या या बाजारामुळे विखरण परिसरातील आर्थिक व व्यापारी व्यवहारांना चालना मिळणार आहे. या बाजारात विखरणसह अर्थे, बलकुवा, भरवाडे, टेंभे बु., टेकवाडे, खामखैडा, प्र.था. लोंढरे, अंतर्ली, भटाणे, जवखेडा, नवे रामपूर, जुने भामपूर, उखळवाडी, जळोद, मुखेड आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या आठवडे बाजारात शेतीउपयोगी साहित्य, फळभाज्या, धान्य, जनावरांचा व्यापार, कपडे, घरगुती वस्तू आदी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. स्थानिक व्यापाऱ्यांसह शेजारच्या तालुक्यातील व्यावसायिकांनीही या बाजारात सहभाग घेतला.
बाजाराच्या प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते, शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने बाजार सुस्थितीत आणि शिस्तबद्ध राहावा यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
परिसरातील नागरिकांनी या नव्या उपक्रमाचे स्वागत करत नियमितपणे बाजार भरवावा अशी मागणी केली असून, विखरण गाव आगामी काळात व्यापारी केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला
