हरियाणा / बागपत, २६ ऑक्टोबर २०२५:
प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. लोणी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या सहकारी संस्थेने सुमारे *५०० गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करून परतावा न देता पसार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बागपत पोलिसांनी दोन्ही अभिनेत्यांसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोप काय आहेत?
बागपतचे पोलिस अधीक्षक सूरज कुमार राय यांनी सांगितले की, या सहकारी संस्थेने पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणातील अनेक भागांमध्ये उच्च परताव्याचे आमिष दाखवत ठेवी घेतल्या. ठेवींवरील परतावा देण्यात आला नाही, आणि काही काळानंतर संस्थेचे अधिकारी अचानक बेपत्ता झाले.
तक्रारदार बबली नावाच्या रहिवाशाने सांगितले की, या संस्थेचे एजंट्स मेरठ, शामली, बागपत आणि आसपासच्या जिल्ह्यांत कार्यरत होते. संस्था मुदत ठेवी, सुकन्या योजना, आयुष्मान योजना, बचत खाते आणि एटीएम लिंक्ड पॉलिसी अशा अनेक योजनांचा प्रचार करत होती.
कोट्यवधींची फसवणूक
गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने ठराविक कालावधीत पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठरलेल्या मुदतीनंतरही परतावा मिळाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एकूण कथित फसवणूक सुमारे ५ कोटी रुपयांची आहे.
पोलिसांची कारवाई
२० ऑक्टोबर रोजी या प्रकरणात २२ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३५१(२) तसेच अनियंत्रित ठेव योजनांवर बंदी कायदा आणि सोसायटी नोंदणी कायद्याच्या विविध कलमांखाली कारवाई सुरू आहे.
पोलीस सध्या कंपनीचे डिजिटल व्यवहार, बँक खाते व मोबाईल ॲप्लिकेशन्स तपासत आहेत. गरज पडल्यास आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेतली जाणार आहे.
कलाकारांची भूमिका काय?
श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ हे या सहकारी संस्थेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करत होते. गुंतवणूकदारांनी तक्रारीत नमूद केले आहे की, दोन्ही कलाकार सोसायटीच्या जाहिरातींमध्ये दिसले होते, ज्यामुळे लोकांना संस्थेवर विश्वास बसला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली.
