नंदूरबार : नंदूरबारमधून मोठी बातमी समोर येत आहे. नंदूरबारच्या देवगोई घाट परिसरात मोठा बस अपघात घडला आहे. देवगोई घाटात एक स्कूल बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली आहे. बसमध्ये 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना अतिशय मोठी आणि धक्कादायक आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून मदतीचं काम सुरु करण्यात आलं आहे. तसेच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत.
सातपुडा पर्वतच्या दुर्गम भागातून विद्यार्थी नंदुरबारमध्ये शाळेत जातात. अशाप्रकारे स्कूल बसमध्ये मुलं शाळेत जात होती. या दरम्यान देवगोई घाटात चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही स्कूल बस थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. इतर विद्यार्थ्यांनादेखील गंभीर इजा झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर बचावकार्यासाठी प्रशासन पोहोचत आहे. पण या घटनेमुळे सातपुड्यातील रस्त्यांची जी दुरावस्था आहे त्याचा प्रश्न पुन्हा एकदा गडद झाला आहे. रस्ता खराब असल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याचा अंदज वर्तवला जात आहे. उद्या सोमवार असल्याने स्कूल बस शाळेच्या विद्यार्थ्यांना सातपुड्याच्या दुर्गम भागातून घेऊन येत होती. या दरम्यान ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण नंदूरबार जिल्हा हादरला आहे.
नंदुरबारमध्ये दुर्गम विद्यार्थी नवे स्वप्न घेऊन शाळेत जातात. पण इथे स्कूल बस आणि शाळा प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो, असा आरोप आता पालकांकडून होत आहे. स्कूल बसमध्ये मर्यादेपक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवलं जातं. विद्यार्थ्यांना अक्षरश: या स्कूलबसमध्ये कोंबलं जातं. याबाबत शाळा प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो, असा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय. आज जी दुर्घटना घडली या घटनेनंतर तरी काही उपाययोजना होईल का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
