काशीद बीचवर सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाची झडप:अकोल्याचे तिघे समुद्रात बुडाले; दोघांचा मृत्यू, एक सुखरूप बचावला

फुले शाहू आंबेडकर
0
समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या अकोल्यातील क्लासेसच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर काळाने झडप घातली. रायगड जिल्ह्यातील काशिद बीचवर गेलेले दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक समुद्राच्या पाण्यात बुडाले. त्यापैकी क्लासचे संचालक राम कुटे (६०, रा. सुधीर कॉलनी, जवाहरनगर) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (१९, अकोला) यांचा मृत्यू झाला असून, आयुष बोबडे (१७) हा विद्यार्थी सुखरूप बचावला आहे. शनिवारी रात्री उशिरा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असा 15 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी प्रसिद्ध काशिद बीचवर फिरायला गेला होता. शनिवारी सायंकाळी यातील काही मुले काशीद येथील समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते. खोल समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक समुद्राच्या पाण्यात वाहून गेले. सोबत असणाऱ्यांनी आरडाओरडा करताच स्थानिक बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचा जीव वाचवता आला नाही. राम कुटे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली तर आयुष रामटेकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर अकोल्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. राम कुटे हे अकोल्यातील शिक्षण क्षेत्रातील एक ओळखीचे नाव होते. त्यांनी सुरुवातीला बारा ज्योर्तिलिंग परिसरात ‘शुअर विन क्लासेस’ सुरू केले आणि नंतर तोष्णीवाल ले-आऊट परिसरात तसेच बुलडाणा येथे शाखा सुरू केली होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक मार्गदर्शन दिले होते. त्यांच्या निधनाने अकोल्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. राम कुटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेचा तपास रायगड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरू असून, अकोल्याच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी घटनेची पुष्टी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default