सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या खोऱ्यात अंमली पदार्थांच्या काळ्या धंद्याने पाय पसरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जावळी तालुक्यातील बामणोली परिसरालगत असलेल्या अत्यंत दुर्गम सावरी गावात छुप्या पद्धतीने सुरू असलेला मेफेड्रोन (एमडी) तयार करणारा कारखाना पोलिसांनी शनिवारी पहाटे उघडकीस आणला. मुंबई व सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या या गुप्त कारवाईत कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल, रसायने आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कोयना खोऱ्यातील जंगलपट्ट्यात, मानवी वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री केल्यानंतर मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग व सातारा पोलीस दलाने संयुक्तपणे मोठ्या पथकासह छापा टाकला. कारवाईदरम्यान शेडमध्ये मेफेड्रोन तयार करण्याची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून मेफेड्रोन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ, ड्रम, भांडी, इलेक्ट्रिक उपकरणे तसेच इतर साहित्य जप्त केले. प्राथमिक तपासात जप्त मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या छाप्यात कारखान्यात प्रत्यक्ष काम करणाऱ्या तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या कारखान्याचा सूत्रधार कोण आहे, हा माल कुठे पाठवला जात होता आणि यामागे आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य रॅकेट आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांना मुळासकट उखडून टाकण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांमध्ये खळबळ उडाली असून कोयना खोऱ्यातील शांततेला लागलेला काळा डाग पुसण्यासाठी पोलीस यंत्रणा कठोर पावले उचलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या नेटवर्कविरोधातील मोठा धक्का मानला जात असून पुढील तपासात आणखी मोठी नावे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
