शिकारीचा थरार अन् थेट मृत्यूच्या दरीत!टेकवाडे शिवारात बिबट्या कोरड्या विहिरीत; रात्रभर रेस्क्यू, वन विभागाची कसोटी

फुले शाहू आंबेडकर
0
टेकवाडे शिवारात शनिवारी (दि. १३ डिसेंबर) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. शिकारीचा पाठलाग करत असताना एक बिबट्या थेट कठडा नसलेल्या, कोरड्या व बंद विहिरीत कोसळल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर वन विभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड धावपळ उडाली असून बिबट्याच्या सुरक्षित सुटकेसाठी रात्रभर युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, टेकवाडे शिवारातील एका शेतात असलेल्या विहिरीजवळ काही युवक कबुतर पकडण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीच्या तळाशी बिबट्या अडकलेला दिसून आला. हा थरारक प्रकार लक्षात येताच युवकांनी तात्काळ गावात धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या आक्रमक होऊ नये, तसेच कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी खबरदारी घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. मात्र, विहीर खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याने तसेच बिबट्या सतत हालचाल करत असल्यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सायंकाळपासून सुरू असलेले रेस्क्यू रात्री उशिरापर्यंत सुरू होते, तरीही सुरुवातीला यश मिळाले नाही. अखेर वन विभागाने विशेष पिंजरा मागवून तो थेट विहिरीत उतरवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारही बंदोबस्तासाठी दाखल झाले. रेस्क्यूदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.
तापी काठावर बिबट्यांचा वाढता वावर
थाळनेर, मांजरोद, अंतुर्ली-तऱ्हाडीसह तापी नदीकाठच्या शेतशिवारात मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या विहिरीत अडकलेला आढळून आल्याने या परिसरातील नागरिकांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी भविष्यातील धोका कायम असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, शिकारीचा पाठलाग करत असताना कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या थेट आत पडला असावा. सध्या धुळे जिल्ह्यातील विविध भागांत नर व मादी बिबट एकत्रितपणे फिरताना दिसत असून हा परिसर त्यांचे संभाव्य प्रजनन क्षेत्र असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.
सतर्कतेचे आवाहन
या पार्श्वभूमीवर वन विभागाने गस्त वाढवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाळीव प्राणी मोकळे सोडू नयेत, शेतातील विहिरींना तातडीने कठडे बांधावेत, तसेच बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
टेकवाडे शिवारातील ही घटना केवळ थरारकच नव्हे, तर मानवी निष्काळजीपणामुळे वन्यजीव आणि माणूस दोघेही कशा प्रकारे धोक्यात येऊ शकतात, याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default