उत्तर सोलापूर तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा काही दिवसांचा पगार प्रलंबित होता. तो पगार काढून देण्यासाठी नायब तहसीलदार हेडगिरी यांनी थेट ६० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे तक्रारदाराने सांगितले. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरवले. मात्र, या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने ५ डिसेंबर रोजी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी नायब तहसीलदाराने कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जाण्यापूर्वी तक्रारदाराला कार्यालयात बोलावले. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने कार्यालयात घुसून नायब तहसीलदारास रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
पगार भरघोस, तरीही लाचेची हाव
विशेष बाब म्हणजे नायब तहसीलदाराचा मासिक पगार सुमारे ६० ते ६५ हजार रुपये असूनही त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला अधिकारी शासकीय कार्यालयातच लाच घेताना पकडला गेल्याने प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
नोटांना लावली होती पावडर, खोटारडेपणा उघड
एसीबीच्या पथकाने सापळा रचताना लाचेच्या नोटांना विशेष ॲन्थ्रासिन पावडर लावली होती. कारवाईदरम्यान नायब तहसीलदाराने “मी पैसे घेतले नाहीत, तक्रारदाराचे माझ्याकडे कोणतेही काम नव्हते,” असे म्हणत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताला व बोटांना पावडर लागल्याचे स्पष्ट दिसून आल्याने त्यांचा खोटारडेपणा उघड झाला. यानंतर ते गप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात नायब तहसीलदाराविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयात उघडपणे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याविरोधातील या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा आणखी एक चेहरा जनतेसमोर आला आहे.
