१ कोटीच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाला कारसह जाळलं – लातूर हादरलं!

फुले शाहू आंबेडकर
0
लातूर/प्रतिनिधी
पैशाच्या हव्यासाने माणुसकीला काळीमा फासणारी थरारक घटना लातूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा अमानुष कट रचत एका निरपराध वृद्धाचा बळी घेण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा मार्गावर शनिवारी पहाटे एका कारला भीषण आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. औसा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र कारच्या आत अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करत जळालेल्या मृतदेहाचे जागेवर शवविच्छेदन करण्यात आले.
कारमध्ये सापडलेल्या हातातील कड्यांवरून आणि वाहन क्रमांकावरून हा मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा दावा नातेवाइकांनी केला. त्या आधारे पोलिसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. मात्र तपास पुढे जाताच या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले.
तपासात कारचा क्रमांक एम.एच. ४३ ए.बी. ४२०० असल्याचे स्पष्ट झाले. ही कार औसा तांड्यातील बळीराम गंगाधर राठोड यांच्या मालकीची असून ती त्यांचा मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) वापरत असल्याचे समोर आले. गणेश चव्हाण हा १३ डिसेंबरच्या रात्री ‘मित्राला लॅपटॉप देण्यासाठी बाहेर जातो’ असे सांगून घराबाहेर पडला होता आणि त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने दिली होती.
मोबाइल चॅटिंग, कॉल डिटेल्स आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलिसांना संशय बळावला. सखोल तपासात हा मृत्यू बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी कोकणातील विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे सापळा रचून गणेश चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची धक्कादायक कबुली दिली.
आरोपी गणेश चव्हाण याच्या डोक्यावर तब्बल ५७ लाख रुपयांचे गृहकर्ज होते. या आर्थिक ओझ्यातून सुटका मिळवण्यासाठी त्याने एक कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा त्याचा थंड डोक्याने आखलेला कट समोर आला. या कटासाठी रस्त्यावर लिफ्ट मागणाऱ्या एका वृद्धाला कारमध्ये बसवून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर कार पेटवून देत अपघाताचा बनाव करण्यात आला. मृतदेह ओळख पटावी म्हणून स्वतःचे हातातील कडेही कारमध्ये टाकण्यात आले.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध खून, पुरावे नष्ट करणे, फसवणूक यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका निरपराध वृद्धाचा जीव घेऊन पैशासाठी मृत्यूचा बनाव रचण्याची ही घटना समाजाला हादरवणारी असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
लातूर जिल्ह्यात घडलेली ही घटना केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर माणुसकीवरचा भीषण हल्ला असल्याचे चित्र स्पष्ट करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default