जमिनीच्या तुकड्यासाठी रक्तरंजित खेळ! लहान भावाने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा निर्घृण खून; नंदुरबार हादरलं

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार (प्रतिनिधी):
शेती व वडिलोपार्जित घराच्या वाटणीचा वाद अखेर जीवघेणा ठरला. नंदुरबार तालुक्यातील जांभीपाडा येथे लहान भावानेच मोठ्या भावाची कुऱ्हाडीने क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जांभीपाडा येथील अजबसिंग महादू पाडवी (वय ६५) आणि त्यांचा लहान भाऊ गोविंद महादू पाडवी यांच्यात शेती व वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. मोठ्या भावाची प्रगती आणि मालमत्तेच्या वाटणीचा राग मनात साठवत असलेल्या गोविंद पाडवीने अखेर टोकाचे पाऊल उचलले.
दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अजबसिंग पाडवी हे त्यांच्या घराच्या ओट्यावर शांतपणे बसले होते. याचवेळी गोविंद पाडवी हातात कुऱ्हाड घेऊन तेथे आला. त्याने मोठ्या भावावर आणि त्यांच्या मुलावर शिवीगाळ करत, “तू आणि तुझा मुलगा फार मातले आहात, मला कायम त्रास देता, आज तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. क्षणाचाही विलंब न करता त्याने अजबसिंग पाडवी यांच्या डोक्यावर व पोटावर जोरदार कुऱ्हाडीचे वार केले.
हल्ला होत असल्याचे पाहताच अजबसिंग पाडवी यांचा मुलगा जुगणू वडिलांना वाचवण्यासाठी धावून आला. मात्र शिवीगाळ करत गोविंद पाडवीने कुऱ्हाड घटनास्थळी टाकली आणि तेथून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत अजबसिंग पाडवी यांचा रक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, जिथे शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, उपनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चौधरी व पोलिस उपनिरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. ठसे तज्ञांनाही पाचारण करून घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने संकलित करण्यात आले.
या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गोविंद महादू पाडवी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा बळी गेल्याने जांभीपाडा परिसरात शोककळा पसरली असून, “मालमत्तेपेक्षा माणुसकी मोठी” असल्याची भावना पुन्हा एकदा या घटनेने अधोरेखित केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default