खामखेडा.प्र.था हादरले! धावत्या कारने घेतला पेट; चालक जिवंत जळून ठार

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर/ प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात माणुसकीला हादरवून सोडणारी थरारक घटना घडली असून, धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने चालकाचा जागीच भीषण अंत झाला आहे. पहाटेच्या शांततेत घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत चालकाचे नाव चंद्रकांत प्रताप धिवरे (वय ४०, रा. खामखेडा, ता. शिरपूर) असे असून, ते कामानिमित्त सुरत येथे वास्तव्यास होते. मूळ गावी खामखेडा येथे येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
 क्षणात पेटली कार, बाहेर पडण्याची संधीच नाही!
बुधवार (दि. १७) रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास खामखेडा शिवारातील टेकवाडा फाटा ते खामखेडा दरम्यान हा भीषण प्रकार घडला. चंद्रकांत धिवरे हे आपल्या स्विफ्ट डिझायर (क्र. GJ-06-JO-6325) कारमधून जात असताना अचानक स्फोटासारखा आवाज झाला आणि क्षणार्धात कारने पेट घेतला.
आगीचा वेग एवढा प्रचंड होता की काही सेकंदांतच संपूर्ण कार ज्वाळांनी वेढली. चालकाला कारमधून बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आणि चंद्रकांत धिवरे यांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला.
स्थानिकांनी धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर…
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकारी व अंमलदारही तात्काळ दाखल झाले. मात्र तोपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती. इतक्या भीषण अवस्थेत वाहन जळाले की, उत्तरीय तपासणीसाठी मृतदेहाचा कुठलाही भाग सुरक्षित मिळू शकला नाही.
 भावाने दिली पोलिसांत माहिती
या प्रकरणी मृताचा भाऊ किशोर प्रताप धिवरे (वय ४८, रा. खामखेडा) यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यांनी सांगितले की, मंगळवार (दि. १६) रोजी सायंकाळी साडेसहा-सातच्या सुमारास चंद्रकांत यांनी फोन करून आपण स्विफ्ट डिझायर कारने खामखेडा येथे येत असल्याचे सांगितले होते. मात्र पहाटे पाचच्या सुमारास गावकऱ्यांकडून कार जळाल्याची व चालक जिवंत जळाल्याची माहिती मिळाली.संजय वाकडे यांच्यासह घटनास्थळी पोहोचल्यानंतर चंद्रकांत धिवरे पूर्णतः जळालेल्या अवस्थेत मृत आढळून आले.
 शॉर्टसर्किट की इंधन गळती? तपास सुरू
कारला नेमकी आग कशामुळे लागली, हा यांत्रिक बिघाड होता की इतर काही कारण, याचा सखोल तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट किंवा इंधन गळतीमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अधिकृत निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांत सुदैवाने जीवितहानी टळली होती. मात्र खामखेडा रस्त्यावरील या दुर्घटनेत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहनांची नियमित यांत्रिक तपासणी, वायरिंगची योग्य देखभाल तसेच इंधन प्रणालीकडे दुर्लक्ष न करता काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default