पुण्यातील धनकवडी परिसरातील एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये तब्बल ८ कोटींच्या ‘मेगा लाच’ व्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवीन सभासदांना समभाग प्रमाणपत्रे देण्यासाठी कोट्यवधींची मागणी करत पहिला हप्ता म्हणून ३० लाख रुपये स्वीकारणाऱ्या प्रशासकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शनिवार पेठेत सापळा रचून रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर प्रशासकासह संबंधित अवसायक (लिक्विडेटर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लाच मागणीचा ‘ब्लॉकबस्टर’ खुलासा
धनकवडीतील या सोसायटीमध्ये जुन्या सभासदांकडून ३२ व्यक्तींनी समभाग खरेदी केले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे सहकार विभागाने प्रशासक म्हणून भास्कर राजाराम पोळ (५६) यांची नेमणूक केली होती. तर सध्या अवसायक म्हणून विनोद माणिकराव देशमुख (५०) काम पाहत होते.
२०२३ मध्ये तक्रारदारांसह सर्व नवीन सभासदांनी समभाग प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते. मात्र तक्रारदाराचा अर्ज जाणीवपूर्वक ‘होल्ड’ ठेवण्यात आला, तर इतरांच्या फाईल्स निकालात काढल्या गेल्या.
सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदारांनी पुन्हा पाठपुरावा केला असता, पोळ यांनी धक्कादायक मागणी केली—
➡️ “सर्वांना समभाग प्रमाणपत्र द्यायचे असतील तर ३ कोटी रुपये द्या!”
ही रक्कम त्यांनी स्वतःसाठी आणि अवसायक देशमुख यांच्यासाठी असल्याचेही सांगितले.
लिलाव प्रक्रियेतही ‘डील’चा आमिष – आणखी ५ कोटी!
तिथेच थांबण्याऐवजी पोळ यांच्याकडून आणखी मोठा गेम खेळण्यात आल्याचा आरोप आहे.
सोसायटीच्या भविष्यातील लिलाव प्रक्रियेत हव्या त्या व्यक्तीस जागा देण्याचे आमिष दाखवत अजून ५ कोटींची मागणी करण्यात आली.
एकूण मागणी – ८ कोटी रुपये!
ACBची गुप्त योजना – ‘शनिवार पेठेत सापळा’
तक्रारदाराने ACBकडे धाव घेतल्यानंतर पडताळणीत लाच मागणीची खात्री पटली.
यानंतर सहायक आयुक्त नीता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने शनिवार पेठेत तक्रारदाराच्या कार्यालयाजवळ अचूक सापळा रचला.
पोळ ठरल्याप्रमाणे ३० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी पोहोचताच
ACBच्या टीमने त्यांना रंगेहाथ जेरबंद केले!
तपासात अवसायक विनोद देशमुख यांचाही सहभाग उघड झाल्याने त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला.
कारवाईमागील हात – कोण होते नेतृत्वात?
🔸 पोलिस अधीक्षक : शिरीष सरदेशपांडे
🔸 अतिरिक्त अधीक्षक : अजित पाटील, अर्जुन भोसले
🔸 कारवाईचे नेतृत्व : सहायक आयुक्त नीता मिसाळ
🔸 तपास अधिकारी : पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर
थरारक लाचकांडाचा सार
समभाग प्रमाणपत्रासाठी ३ कोटींची मागणी
सोसायटीच्या जागांच्या लिलावात आणखी ५ कोटींचा डील
एकूण ८ कोटींची लाच मागणी
३० लाख घेताच प्रशासक ACBच्या जाळ्यात
दोघेही पोलिस कोठडीत
