“आती क्या गाडी पे…?” शाळेच्या गेटजवळच निर्लज्ज छेडछाड! रडत घरी पोहोचलेल्या विद्यार्थिनीने उघड केला धक्कादायक प्रकार, सातपूर परिसर हादरला

फुले शाहू आंबेडकर
0
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच नाशिकमधून एक संतापजनक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची भरदिवसा छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील असा की, सातपूर परिसरातील एका हिंदी माध्यमाच्या शाळेजवळ काल शुक्रवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना रस्त्यालगत थांबलेल्या एका तरुणाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला.
“आती क्या गाडी पे, छोड देता हूं, हिरे स्कूल के पास ही जा रहा हूं,” अशा अश्लील आणि धमकावणाऱ्या शब्दांत शेरेबाजी करत संशयिताने तिचा विनयभंग केला.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी थरथरत घरी पोहोचली. रडत-रडत तिने संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीयही हादरले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सातपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयूर पंडित (वय १९, रा. सातपूर कॉलनी, नाशिक) असे संशयिताचे नाव असून, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या संशयित फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “शाळेत जाणाऱ्या मुलीही सुरक्षित नाहीत का?” असा सवाल उपस्थित होत असून, शाळा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सातपूर पोलीस करत असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा निर्लज्ज कृत्यांवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default