देशाच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराने संपूर्ण संरक्षण मंत्रालय हादरले आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयातील उत्पादन विभागात कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना सीबीआयने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली असून, त्यांच्या घरातून २ कोटी २३ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे लष्कराच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
३ लाखांची लाच… आणि कोट्यवधींचा काळा पैसा
सीबीआयच्या माहितीनुसार, लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा हे नवी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य व निर्यात विभागात उपनियोजन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी दुबईस्थित एका खासगी कंपनीला संरक्षण व्यवहारात फायदा मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.
१८ डिसेंबर २०२५ रोजी विनोद कुमार नावाच्या एका खाजगी व्यक्तीकडून त्यांनी ३ लाख रुपयांची लाच स्वीकारली. ही माहिती आधीच सीबीआयला मिळाल्याने १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करत तातडीने सापळा रचण्यात आला आणि शर्मा यांना अटक करण्यात आली.
सीबीआयच्या धाडी… आणि पैशांचा डोंगर
अटकेनंतर सीबीआयने दिल्ली, राजस्थानमधील श्रीगंगानगर, बेंगळुरू आणि जम्मू येथे एकाच वेळी धाडसत्र राबवले.
दिल्लीतील घरातून – ३ लाखांची लाच आणि २ कोटी २३ लाख रुपये रोख
श्रीगंगानगर (राजस्थान) – १० लाख रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे
नवी दिल्लीतील कार्यालय – तपास अद्याप सुरू
या कारवाईत बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि डिजिटल डेटा हस्तगत करण्यात आला आहे.
पत्नीही संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून, लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांचेही नाव तपासात पुढे आले आहे. त्या सध्या राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे १६ इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिटच्या कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
भ्रष्टाचाराच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीबीआय त्यांची चौकशी करत आहे.
दुबई कनेक्शन उघड
प्राथमिक तपासात या लाचखोरीचे दुबईशी थेट कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. संरक्षण क्षेत्रातील निर्यात आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारात एका दुबईस्थित कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी हे रॅकेट कार्यरत होते. या प्रकरणात आणखी लष्करी अधिकारी, दलाल किंवा परदेशी कंपन्या सहभागी आहेत का, याचा शोध सीबीआय घेत आहे.
न्यायालयाचा कडक पवित्रा
सीबीआयने दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २३ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह
संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ‘सीमेवर जवान प्राण देतात, आणि मागे बसलेले अधिकारी लाच खातात?’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सीबीआयचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे या प्रकरणातील मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता
