पिंपरी-चिंचवडला कर्जात ढकलणाऱ्यांना बाजूला सारा:अजित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा; भैरवनाथाचे दर्शन घेत केला प्रचाराचा शंखनाद

फुले शाहू आंबेडकर
0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. स्थानिक भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन अजित पवार यांनी या रणांगणात विकासाचा नारळ फोडला. पिंपरी-चिंचवडला कर्जाच्या खाईत ढकलणाऱ्यांना आता बाजूला सारण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शरद वसंत भालेकर, चारुलता रितेश सोनवणे, सीमा धनंजय भालेकर आणि पंकज दत्तात्रय भालेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शहराच्या प्रगतीचा आराखडा मांडताना सांगितले की, कष्टकरी आणि उद्योजकांची नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, रोजगार, पर्यावरण आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस ठोस काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आम्हाला जातीभेदाला थारा न देता सर्वांना न्याय देणारा विकास घडवायचा आहे, असे स्पष्ट करत अजित पवारांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचा पुनरुच्चार केला. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नेतृत्वाकडे दूरदृष्टी असणे आवश्यक आहे आणि ती जबाबदारी राष्ट्रवादीचे उमेदवार पूर्ण ताकदीने पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पक्षाने नवीन आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी देऊन सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपवर अप्रत्यक्ष टीका यावेळी बोलताना अजित पवारांनी नाव न घेत भाजपवरही अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, महापालिकेत रिंग चालली आहे, वारे माप खर्च चालला आहे. जॅकवेल निविदा 30 टक्क्यांनी वाढविण्यात आली. कुदळवाडीत जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. संत पीठात वारकरी घडवायचे होते, मात्र तिथे संत पिठात सीबीएससी स्कूल सुरू केली आहेत. संत पिठात गीता रामायण शिकवण्यात येत नाही, संत पिठात कंपनी सुरू केली. संत पीठ हे फक्त नावापुरते राहिले असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली. महापालिकेवर कर्ज झाले आहे, हे पाप कोणाचे? पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, जे ठरले होते ते का थांबवण्यात आले, वेगळ्या पद्धतीच राजकारण जे चालल ते थांबवायला हवे. पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या 25 वर्षांच्या राजकारणात मी कधी कर्ज काढले नव्हते. आज महापालिकेवर कर्ज झाले आहे, हे पाप कोणाचे? असा सवाल करत अजित पवार यांनी नाव न घेता महेश लांडगे यांच्या कारभाराकडे लक्ष वेधले. कार्यकर्ते हाच पक्षाचा कणा निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच दिवशी अन्य पक्षांतील अनेक मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. नवीन सहकाऱ्यांचे स्वागत करतानाच, कार्यकर्ते हाच पक्षाचा कणा आहेत, त्यांना स्थानिक पातळीवर सर्वतोपरी ताकद दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. भैरवनाथाच्या साक्षीने कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि शहराच्या प्रगतीत कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द त्यांनी यावेळी पिंपरी-चिंचवडकरांना दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default