भावा, वाटलं नव्हतं असं करशील!”जिवलग मित्रानेच घात केला विश्वासघात; सीसीटीव्हीने उघड केला चोरीचा रोजचा डाव

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार/ नवापूर (खांडबारा)
मैत्री, विश्वास आणि रोजचा वावर… पण याच नात्याचा गैरफायदा घेत दुकानदाराच्या जिवलग मित्रानेच गल्ल्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना नवापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. खांडबारा गावात सुरू असलेल्या खत व बियाणे विक्रीच्या दुकानात दररोज पैसे गायब होत असल्याचा संशय अखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सत्यात उतरला—आणि चोर दुसरा कोणी नसून दुकानदाराचा जिवलग मित्र असल्याचे समोर आले.
खांडबारा येथील व्यापारी जितू सुरेश परदेशी यांच्या दुकानातील गल्ल्यातून रक्कम कमी पडत असल्याचे काही दिवसांपासून त्यांच्या लक्षात येत होते. सुरुवातीला हिशेबातील चूक असेल, असे वाटले; मात्र संशय वाढताच त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज पाहताच त्यांना अक्षरशः धक्का बसला.
कॅमेऱ्यात कैद झाली ‘दररोजची’ चोरी
सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसते की दुकानात नेहमी येणारा मित्र अनिल रंजनलाल शर्मा ठराविक वेळेला येतो, गल्ल्याजवळील खुर्चीवर निवांत बसतो. व्यापारी इतर ग्राहकांत गुंग होताच तो हळूच गल्ल्यात हात घालतो आणि नोटा खिशात सरकवतो. हा प्रकार एखाद्या योगायोगापुरता मर्यादित नसून दररोजची सवय असल्याचे फुटेजमधून ठळकपणे स्पष्ट झाले आहे.
अतिविश्वासाचा गैरफायदा, मानसिक धक्का
जवळचे नाते, मोकळा वावर आणि अंधविश्वास—याच गोष्टींचा फायदा घेत चोरी केल्याने व्यापाऱ्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे. “आपल्याच माणसाने असे करावे,” ही भावना फुटेज पाहिल्यानंतर अधिकच तीव्र झाली.
व्हिडिओ व्हायरल, पोलीस कारवाई
ही चोरीची दृश्ये सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून प्रकरणाने परिसरात खळबळ उडवली आहे. या घटनेप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात जितू सुरेश परदेशी (रा. खांडबारा) यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा (रा. खांडबारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सीसीटीव्हीने वाचवली मेहनतीची कमाई
या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. कितीही जवळचा असला तरी गल्ला, रोकड आणि हिशेबांबाबत दुर्लक्ष नको—कारण सीसीटीव्ही नसता तर हा विश्वासघात कदाचित उघडकीसच आला नसता!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default