राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजहिताला अग्रक्रम देणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श जपत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर तालुक्यात मानवतेचा ठसा उमटवणारे उपक्रम राबविण्यात आले. दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळपासूनच शहरात सेवाभावी वातावरण निर्माण झाले.
सकाळी ९ वाजता शिरपूर येथील निवासी आश्रम शाळेत फळ वाटप कार्यक्रमाने उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ११ वाजता मुकेश पटेल टाउन हॉलजवळील कॉटेज हॉस्पिटल, शिरपूर येथे रुग्णांना फळ वाटप करून त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ औपचारिकता न करता गरजू, दुर्लक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या सेवायज्ञाचा केंद्रबिंदू ठरले अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, शिरपूर जि. धुळे या बालगृहात सध्या ७५ अनाथ बौद्धिक अक्षम बालके वास्तव्यास असून, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे या उद्देशाने फळ वाटप करण्यात आले. बालकांशी संवाद साधत उपस्थित मान्यवरांनी त्यांना आत्मीयतेचा आधार दिला.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष व्यंकटेश पाटील शिरपूर
विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष दिलीप भाईदास पाटील,
तालुका सचिव ज्ञानेश्वर धुडकू पाटील,
तालुका उपाध्यक्ष मोहन दौलत कोळी व मुलचंद गुजर,
राजेंद्र साहेबराव पाटील,
अॅड. रोहितकुमार पाटोळे,
अब्दुल वंजीर फिर,
प्रेमचंद भिमराव पाटील यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष शिक्षक श्री. निलेश पाटील सर यांनी केले. यावेळी बालगृहाचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. डी. एम. पाटील सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी हा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरला असून, शिरपूर तालुक्यात सामाजिक जाणीवेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

