नाशिक शहरात रविवारी संध्याकाळी एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेला आनंद, जल्लोष आणि मंगलाष्टकांचा गजर एका क्षणातच आक्रोशात बदलला. बोहल्यावर चढण्याच्या काही मिनिटे आधीच २९ वर्षीय नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने संपूर्ण विवाहसोहळ्यावर शोककळा पसरली.
मुंबई येथील दीपशिखा गोडबोले (वय २९) हिचा विवाह सोहळा नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता. शनिवारी हळद, मेहंदी, संगीत अशा सर्व विधी उत्साहात पार पडले. दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी आनंदात सहभागी झाले होते. कुणालाही कल्पना नव्हती की हा आनंद काही तासांतच शोकांतिकेत बदलणार आहे.
मुहूर्ताच्या आधीच घडली काळजाचा ठोका चुकवणारी घटना
रविवारी नियोजित मुहूर्ताच्या वेळी दीपशिखा नववधूच्या वेषात सजत असतानाच तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. मात्र आदल्या दिवशी झालेलं जागरण, लग्नाची धावपळ आणि थकवा यामुळे असेल, असे समजून तिने याकडे दुर्लक्ष केले. पूर्ण तयार झाल्यावर ती लग्नमंडपात आली.
परंतु बोहल्यावर चढण्याआधीच तिला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. क्षणातच मंडपात गोंधळ उडाला. नातेवाईक, वरपक्ष आणि उपस्थित पाहुणे धावत आले. तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित
डॉक्टरांनी तपासणी करताच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मंगलाष्टकांच्या जागी रडारड, आक्रोश आणि स्तब्ध शांतता पसरली. काही वेळापूर्वी हसतमुख असलेले चेहरे अश्रूंनी भरले.
पोलीस नोंद प्रक्रियेत
या घटनेची नोंद नाशिक तालुका पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
पोलीस निरीक्षक मृदूला नाईक यांनी माहिती देताना सांगितले की, “बोहल्यावर चढण्यापूर्वीच नववधूचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.”
आनंदाच्या क्षणातच मृत्यूने घातली झडप
हळद, मेहंदी, लग्नाची तयारी, स्वप्नातला संसार… आणि अवघ्या काही क्षणांतच सर्वकाही संपलं. नवजीवनाच्या उंबरठ्यावर उभी असलेली तरुणी काळाच्या पडद्याआड गेल्याने नाशिकसह मुंबईतही हळहळ व्यक्त होत आहे.
