नाशिकमध्ये राजकीय रणसंग्राम!भाजप–शिवसेना, ठाकरे बंधू, दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने; महापालिका निवडणूक चौरंगी ठरणार!

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक /प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका निवडणूक आता केवळ राजकीय लढत न राहता सत्तेसाठीचा उघड संघर्ष ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. राज्यातील सत्तासंघर्ष, पक्षांतरांचे वाढते प्रमाण आणि नेत्यांमधील अविश्वास यामुळे नाशिकची निवडणूक दुरंगी-तिरंगी नाही तर थेट चौरंगी रणांगण होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
एकीकडे भाजप–शिवसेना (शिंदे गट), दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती, तिसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, तर चौथ्या आघाडीवर काँग्रेस व इतर पक्ष अशी थेट टक्कर होण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
आयारामांची गर्दी, राजकीय शस्त्रसाठा वाढतोय!
सध्या नाशिकच्या राजकारणात पक्षांतरांचा पूर आलेला आहे. निवडून येण्याची क्षमता हेच एकमेव निकष मानत भाजपने इतर पक्षांतील आयारामांसाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत. त्याच मार्गावर शिवसेनादेखील चालताना दिसत आहे.
याउलट उबाठा, मनसे आणि काँग्रेसमध्ये नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने अंतर्गत गळती वाढल्याचे चित्र आहे.
 महायुती–मविआचा प्रयोग फसणार?
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रयोग नाशिकमध्ये होईल, असे संकेत होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हे गणित पूर्णपणे बिघडताना दिसत आहे.
भाजपने थेट “१०० प्लस”चा नारा दिला आहे.
शिवसेनेनेही स्वबळाची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
महायुती झाली नाही, तर भाजप आणि शिवसेना सर्व जागांवर स्वतंत्र लढणार, अशी शक्यता आता बळावत आहे.
 राष्ट्रवादी एकत्र येणार?
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप–शिवसेनेने फारसे महत्त्व दिले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकमध्ये एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
जर हे घडले, तर नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप होणार, यात शंका नाही.
 ठाकरे बंधूंचा नाशिक फॉर्म्युला ठरला?
मुंबईनंतर नाशिकमध्येही ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार नाशिकमधील १२२ जागांपैकी
उबाठा : ६५ ते ७० जागा
मनसे : ४५ ते ५० जागा
काँग्रेस व इतर : १० जागा
असा जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे.
 नाशिकची निवडणूक थराराच्या टोकावर
एकीकडे सत्ता टिकवण्याचा प्रयत्न, दुसरीकडे सत्ता उलथवण्याची तयारी, तिसरीकडे अस्तित्वाची लढाई — नाशिक महानगरपालिका निवडणूक म्हणजे आता राजकीय युद्धभूमी ठरणार आहे.
दुरंगी-तिरंगीची चर्चा मागे पडत असून,
भाजप, शिवसेना, ठाकरे बंधू, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अशा चौरंगी लढतीने नाशिक पेटणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default