चंदन नगर परिसरात काल रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या नागरिकांच्या बैठकीनंतर आज सकाळी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. “प्रभाग क्रमांक पाचमधून तुम्हीच निवडणूक लढवा” असा ठाम आग्रह नागरिकांनी धरल्यानंतर अखेर लोकाग्रहास मान देत कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी महाराष्ट्रचे पक्ष सेक्रेटरी असलेल्या कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांची ओळख ही नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे, अन्यायाविरोधात संघर्ष करणारे आणि पारदर्शक राजकारणाचा आग्रह धरणारे नेतृत्व म्हणून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक पाचमधील पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, युवकांचे प्रश्न तसेच सामाजिक अन्यायाविरोधातील लढ्यांमध्ये ते सक्रियपणे सहभागी राहिले आहेत.
काल झालेल्या बैठकीत नागरिकांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत सांगितले की, “पक्षीय राजकारणामुळे प्रभागाचे नुकसान झाले आहे. आता आम्हाला पक्ष नव्हे, माणूस हवा आहे.” याच भावनेतून नागरिकांनी कॉम्रेड जगदेव यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा आग्रह धरला. अखेर आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत “ही उमेदवारी माझी नसून प्रभागातील सामान्य जनतेची आहे” अशी ठाम भूमिका मांडली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव म्हणाले,
“मी ही निवडणूक कोणत्याही सत्तेसाठी नाही तर प्रभागातील लोकांच्या सन्मानासाठी, हक्कांसाठी आणि विकासासाठी लढणार आहे. ही लढाई सामान्य नागरिकांची आहे.”
त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक पाचमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, प्रस्थापित पक्षांमध्येही खळबळ उडाली आहे. जनतेच्या थेट पाठिंब्यावर उभी असलेली ही उमेदवारी आगामी निवडणुकीत मोठा निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे.
चंदन नगर प्रभाग क्रमांक पाचमध्ये आता “लोकशक्ती विरुद्ध पक्षशक्ती” असा थेट सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, येत्या दिवसांत प्रचार आणखी आक्रमक आणि निर्णायक वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
