गोपनीय टिप… आणि पोलिसांचा सुस्कारा थांबवणारा धाडसी छापा
उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना सुकेवाडीतील एका गोदामातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन पाटील यांनी विशेष पथक तयार करून संगमनेर पोलिसांच्या मदतीने गोदामावर थेट छापा टाकला.
गोदामात शिरताच पोलिसांना गांजाचा तीव्र वास जाणवत होता. झडती घेताच घराच्या आत ३०० किलो सुका गांजा पॅकिंगसह सापडला. परिसरातील एका छोट्या टेम्पोची तपासणी केली असता आणखी १५६ किलो गांजाचे पॅकेट्स मिळून आले. दोन्ही ठिकाणांहून मिळून ४५६ किलो गांजा हस्तगत करण्यात आला.
पिता-पुत्रावर गुन्हा, पिता गजाआड – पुत्र फरार
स्थळी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे उत्तम बबन पडवळ (५५) व त्याचा मुलगा तुषार पडवळ (३१) यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तम पडवळला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तुषार मात्र अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
स्थानीय पोलिसांना सुगावा नव्हता? चर्चा तापली
या प्रचंड मोठ्या प्रमाणातील तस्करीचे जाळे संगमनेरच्या अगदी जवळ उघड होत असताना स्थानिक पोलिसांना याची कल्पनाही कशी नव्हती?—हा प्रश्न शहरभर चर्चेत आहे.
नाशिक पथकाने येऊन कारवाई केल्याने संगमनेर परिसरात अमली पदार्थांचा मजबूत बेस तयार असल्याचे ठोस संकेत मिळत असल्याचे जाणकार सांगतात.
राजकीय वादावर शिक्कामोर्तब?
संगमनेर नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. प्रचारात शहरात गांजा, ड्रग्स विक्री वाढल्याचा मुद्दा विरोधकांनी सातत्याने मांडला होता. स्वतः माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हे शहर ‘अंमली पदार्थांचे केंद्र’ बनत असल्याची टीका केली होती.
नाशिक पथकाच्या या धाडसी कारवाईने प्रचारातील त्या आरोपांना नवे इंधन मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.
याआधी ६०० किलो गांजाचा साठा उघड – जिल्ह्यात तस्करांचं वाढतं जाळ
यापूर्वी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाथर्डी परिसरातून ६०० किलो गांजा जप्त केला होता. आंध्रप्रदेशातून थेट वाहतूक करून जिल्ह्यात साठवणूक केली जात असल्याचेही पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते.
आता संगमनेरातून पुन्हा एवढा मोठा माल मिळाल्याने जिल्ह्यात गांजा तस्करीचं मोठं जाळं सक्रिय असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे
पोलिस दलाचा धडाकेबाज सहभाग
या ऑपरेशनमध्ये—
उपअधिक्षक गुलाबराव पाटील
API भागवत व्यवहारे
API पंकज खरे
आणि त्यांच्या विशेष पथकाचा उल्लेखनीय सहभाग होता.
धक्कादायक निष्कर्ष
शहराच्या सीमेवरच ‘गांजाचे गोदाम’ कार्यरत ठेवण्यात येतं… स्थानिकांना सुगावा लागत नाही… नाशिक पथक येऊन छापा टाकतं…
ही संपूर्ण परिस्थिती संगमनेरमध्ये तस्करीचे जाळे किती खोलवर रूजले आहे याची ठोस साक्ष देत आहे.
