महाराष्ट्रात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधून एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी व्यक्तीची लष्कर परिसरात निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण शहरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या घटनेने केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
निवडणूक तयारीत असतानाच काळाचा घाला
हत्या झालेल्या तृतीयपंथी इच्छुक उमेदवाराचे नाव अय्युब सय्यद असे असून ते सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. अशा निर्णायक काळातच ही धक्कादायक घटना घडली आहे.
अय्युब सय्यद हे सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांनी निवडणुकीसंदर्भात तयारीचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. विशेष म्हणजे त्यांचे लाखो फॉलोअर्स असून ते शहरात एक ओळखीचे नाव होते.
रात्री तीन अनोळखी, पहाटे मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेअकराच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यानंतर हेच तिघे पहाटे सुमारे दोनच्या सुमारास घराबाहेर पडताना दिसत आहेत.
आज दुपारी अय्युब सय्यद यांचा मृतदेह घरात आढळून आला. शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्याने ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोन्याच्या संपत्तीमुळे की राजकीय वैरातून हत्या?
अय्युब सय्यद यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याची दागिने आणि आर्थिक संपत्ती असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे ही हत्या लूटमारीसाठी करण्यात आली की निवडणूक इच्छुक उमेदवार असल्यामुळे राजकीय वैरातून झाली, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी घरातील परिस्थिती, CCTV फुटेज आणि परिसरातील हालचालींच्या आधारे तपासाचा वेग वाढवला आहे. हत्या करून पसार झालेल्या तीन संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
शहरात दहशतीचे वातावरण, तृतीयपंथी समाजात संताप
या घटनेनंतर सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः तृतीयपंथी समाजात भीती आणि तीव्र संतापाची भावना आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीचा अशा पद्धतीने खून होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.
हत्या उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान
सोलापूर शहर पोलिसांसमोर ही हत्या लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. CCTV फुटेज हे तपासातील महत्त्वाचे धागेदोरे ठरण्याची शक्यता असून आरोपी लवकरच जेरबंद केले जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अय्युब सय्यद यांच्या हत्येमागील नेमके कारण काय, हे तपासाअंती स्पष्ट होणार असले तरी ही घटना सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला हादरवून टाकणारी ठरली आहे.
