पेठ तालुक्यातील नदीतून केवळ अर्धा ब्रास वाळू उचलल्याच्या प्रकरणात वन कायद्याची भीती दाखवत डम्पर सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याने नाशिकच्या वन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील वन परिक्षेत्रीय कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे आणि वनपाल सुनील टोंगारे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तक्रारदाराने आपल्या मुलाच्या नावावर नवीन टाटा हायवा डम्पर घेतला असून, स्वतःच्या जुन्या घराच्या प्लास्टरसाठी पेठ तालुक्यातील खामशेत येथील नदीतून दोन महिन्यांपूर्वी अर्धा ब्रास वाळू घेतली होती. ही वाळू वाहतूक करत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे यांनी डम्पर अडवून वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
पकडलेली मालमोटार सोडवण्यासाठी तक्रारदार हरसूल येथील वनपरिक्षेत्रीय कार्यालयात गेला असता, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे यांनी थेट ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रार प्राप्त होताच ACB पथकाने पडताळणी केली. तपासात असे निष्पन्न झाले की, सुरुवातीला ३५ हजार रुपये घेऊन गाडी सोडायची आणि नंतर उर्वरित १५ हजार रुपये स्वीकारायचे, असा डाव आखण्यात आला होता. याशिवाय, वनपाल सुनील टोंगारे याने एकूण लाचेपैकी १० हजार रुपये स्वतःसाठी मागितल्याचेही उघड झाले.
योजनेनुसार हरसूल येथील वन परिक्षेत्रीय कार्यालयात ३५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असताना ACB पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. या कारवाईनंतर हरसूल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून उपअधीक्षक स्वाती पवार यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात पोलीस हवालदार शरद हेंबाडे, अविनाश पवार, युवराज खांडवी, दिनेश खैरनार आणि परशुराम जाधव यांचा समावेश होता.
