धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत राजकारणाचा वेग इतका प्रचंड वाढलाय की, निष्ठा-निष्ठावंतपणा बाजूला पडून क्षणात पक्षांतर आणि मिनिटांत सत्तेची खुर्ची हेच नवं गणित बनलं आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे उज्ज्वला भोसले. कालपर्यंत राष्ट्रवादीच्या गोटात असलेल्या आणि आज थेट भाजपच्या तिकीटावर बिनविरोध नगरसेविका – अवघ्या २४ तासांत घडलेला हा राजकीय चमत्कार सध्या धुळ्यापासून मुंबईपर्यंत चर्चेचा विषय ठरलाय.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचा दिवस होता. अर्ज भरल्यानंतर आज छाननी प्रक्रिया पार पडली. राज्यभरात अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्यांना डावललं गेलं, तर दुसरीकडे क्षणार्धात पक्ष बदलणाऱ्यांनी बाजी मारली.
धुळ्यात घडलेली घटना तर राजकीय इतिहासात ‘रिकॉर्डब्रेक’ म्हणावी अशीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे शहराध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच क्षणी राजकीय पटावर सगळी समीकरणं बदलली. भाजपने तात्काळ रणजीत भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले यांना उमेदवारी दिली.
सुरुवातीला त्यांच्या विरोधात चार उमेदवार मैदानात होते. मात्र आज झालेल्या छाननी प्रक्रियेत एकामागोमाग एक अर्ज बाद झाले. परिणामी, उज्ज्वला भोसले बिनविरोध निवडून आल्या. काल भाजपमध्ये प्रवेश, आज नगरसेविकेचा शपथविधी – असा वेगवान प्रवास धुळे महापालिकेत याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. विशेष म्हणजे, त्या धुळे महापालिकेतील भाजपच्या पहिल्या महिला नगरसेविका ठरल्या आहेत.
एकीकडे एबी फॉर्मसाठी ताटकळणारे, तिकीट न मिळाल्याने डोळ्यांत अश्रू असलेले निष्ठावंत कार्यकर्ते, तर दुसरीकडे अवघ्या एका दिवसात सत्ता मिळवणारे आयाराम – हेच आजच्या राजकारणाचं कटू वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. निष्ठेला किंमत नाही, तर संधीला सलाम अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
धुळे महापालिकेची शेवटची निवडणूक २०१८ मध्ये झाली होती. त्या वेळी भाजपने ७४ पैकी तब्बल ५० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादीला ८, काँग्रेसला ६, एमआयएमला ४ आणि शिवसेनेला केवळ १ जागा मिळाली होती. त्याआधीच्या निवडणुकीत भाजपचे ३४ तर शिवसेनेचे ११ उमेदवार विजयी झाले होते.
