अनैतिक संबंधांचा रक्तरंजित शेवट! ‘ती’च ठरली मारेकऱ्याची सावली; नागसेनवाडीत रिक्षाचालकाचा निर्घुण खून उघड

फुले शाहू आंबेडकर
0
वडाळानाका परिसरातील नागसेनवाडी  येथे घडलेल्या रिक्षाचालक सुमीत सुखारन राखपसरे (वय २८) यांच्या निर्घुण हत्येप्रकरणाने आता अधिकच भीषण वळण घेतले आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून पेटलेल्या संशयाच्या आगीत केवळ खूनच नाही, तर एका अल्पवयीन मुलीचे आयुष्यही उद्ध्वस्त झाल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित ओमकार अर्जुन गायकवाड याच्यासोबत त्याची विधिसंघर्षित अल्पवयीन प्रेयसीही सहसंशयित म्हणून समोर आली आहे. खुनानंतर घाबरलेल्या अवस्थेत ओमकार थेट तिच्याच घरी गेला. अंगावर मृत सुमीतचे रक्त लागलेले कपडे त्याने तेथेच बदलले, तसेच हत्या करण्यासाठी वापरलेला चाकूही तिच्या घरात लपवून ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकारामुळे संशयित प्रेयसीने मारेकऱ्यास आसरा दिला, पुरावे लपवण्यास मदत केली, असा गंभीर आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. ती सध्या अकरावी इयत्तेत शिक्षण घेत असून अल्पवयीन असल्याने तिच्याविरोधातील सर्व कार्यवाही बाल न्यायमंडळामार्फत सुरू आहे. पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडे व चाकू जप्त केला असून वैज्ञानिक तपासही सुरू आहे.
दरम्यान, तपासात आणखी एक धक्कादायक बाब पुढे येण्याची शक्यता आहे. मृत सुमीतच्या प्रेयसीच्या संशयित पतीचा या हत्येशी काही संबंध आहे का, याचाही पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. अनैतिक संबंध, संशय आणि त्यातून झालेला संतापजन्य उद्रेक—या सगळ्या धाग्यांची सांगड घालत पोलीस सत्य उघडकीस आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बाध यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, लवकरच आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 ‘भाई’ बनण्याच्या हव्यासात आयुष्य उद्ध्वस्त!
अटक करण्यात आलेल्या ओमकार गायकवाडने स्वतःला नागसेनवाडीचा ‘भाई’ बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, एका खुनाने त्याचे आयुष्यच नाही तर संपूर्ण भवितव्य अंधारात गेले आहे. या गंभीर गुन्ह्यामुळे त्याला जामीन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ओमकारचे वडील परागंदा असून तो आईसोबत राहत असल्याची माहिती आहे. तर या प्रकरणातील दुसरा संशयित मोईन शेख याचे वडील रिक्षाचालक असून आई गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे समजते.
 अनैतिक संबंधांचा हा रक्तरंजित शेवट नागसेनवाडीला हादरवून गेला असून, एका खुनासोबतच अनेकांचे आयुष्य कायमचे बदलून गेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default