उच्चभ्रू परिसरात आलिशान ‘हेअर अॅण्ड स्किन केअर’ क्लिनिक थाटून स्वतःला नामांकित त्वचारोगतज्ज्ञ व सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ म्हणून मिरवणाऱ्या बोगस डॉक्टर दाम्पत्याचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. पदवी, वैद्यकीय नोंदणी काहीही नसताना शेकडो रुग्णांवर उपचार, लेझर थेरपी आणि बेकायदेशीर प्लास्टिक सर्जरी केल्याचा गंभीर प्रकार कॉलेज रोडवरील विसेमळा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, पूर्वी उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरुणाचा चेहरा विद्रूप, आयुष्यभराचा व्रण
शहरातील शुभम गुजर (वय २६) हा तरुण काही महिन्यांपूर्वी चेहऱ्यावरील आजाराच्या उपचारासाठी ‘स्किनरेला द एस्थेटिक स्किन अॅण्ड हेअर क्लिनिक’मध्ये गेला होता. संशयित सुजाता घोशाल हिने स्वतःकडे वैद्यकीय शिक्षण व विविध तज्ज्ञ पदव्या असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखवून उपचार सुरू केले. मात्र चुकीच्या उपचारांमुळे शुभमच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होऊन कायमस्वरूपी व्रण पडले आणि चेहरा विद्रूप झाला. या प्रकरणाचा पाठपुरावा करत शुभमने आरोग्य विभागाकडे तक्रार केली आणि अखेर बोगस डॉक्टरांचा भांडाफोड झाला.
सोशल मीडियावर खोटी जाहिरात, रुग्णांची लूट
मनपाच्या चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जयदीप व सुजाता घोशाल यांनी सोशल मीडियासह विविध माध्यमांतून स्वतःला
‘डर्मेटोलॉजिस्ट’, ‘कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट’, ‘एस्थेटिक डर्मेटोलॉजिस्ट’, ‘लेझर स्पेशलिस्ट’, ‘हेअर ट्रान्सप्लांट सर्जन’, ‘ट्रायकोलॉजिस्ट’
अशा बोगस पदव्यांचा वापर करून जाहिरातबाजी केली. या खोट्या दाव्यांच्या आधारे शेकडो रुग्णांकडून तपासणी व उपचारासाठी मोठी रक्कम उकळण्यात आली. लेझर उपचार, केमिकल पील्स, स्टेरॉइड इंजेक्शन्स आणि शस्त्रक्रिया बेकायदेशीररीत्या केल्याचेही उघड झाले आहे.
जुन्या गुन्ह्यांची काळी पार्श्वभूमी
या प्रकरणानंतर घोशाल यांचे ‘काळे कारनामे’ एकामागोमाग एक उघड होत आहेत. सन २०१७ मध्ये संशयित जयदीप घोशाल याला सरकारवाडा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी तस्करी व देहविक्रय प्रकरणी ‘पिटा’ कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. त्याच्या वेलनेस क्लिनिकमधून चार तरुणींवर गैरकृत्य झाल्याचेही तपासात समोर आले होते. विशेष म्हणजे, तो अद्याप जामिनावर बाहेर आहे.
याशिवाय सन २०२० मध्ये पंचवटीतील एका तरुण उद्योजकाच्या नाकावर भूल न देता शस्त्रक्रिया केल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्या प्रकरणातही घोशाल दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल
पीडितांच्या तक्रारीनंतर मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या आदेशाने विशेष चौकशी समिती गठित करण्यात आली. समितीच्या अंतिम अहवालात वैद्यकीय निष्काळजीपणा, आवश्यक शैक्षणिक पात्रतेचा अभाव, रुग्णांची लेखी संमती न घेणे, बायोप्सी न करणे, तज्ज्ञांचे दुसरे मत न घेणे आणि चुकीचे निदान केल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल, अटक व क्लिनिक सील करण्याची तयारी
या अहवालाच्या आधारे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार देवकर यांनी फिर्याद दिली असून, सरकारवाडा पोलीस ठाण्यात जयदीप सलील घोशाल (वय ५८) आणि सुजाता जयदीप घोशाल-पिंगे (वय ५५) यांच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली असून, मनपाचे पथक ‘स्किनरेला’ क्लिनिक सील करण्याच्या तयारीत आहे.
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
बोगस डॉक्टरांचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील आरोग्य यंत्रणा, परवाने आणि तपासणी व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. निष्पाप रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
