उज्ज्वल भविष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन घराबाहेर पडलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा अखेर मृत्यू झाला… रॅगिंग, मारहाण, मानसिक छळ आणि प्राध्यापकाच्या अश्लील वर्तनाचा आरोप करत केलेली आर्त हाक मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत कैद झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून शिक्षणसंस्थांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धर्मशाळा येथील एका सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीचा 26 डिसेंबर रोजी लुधियाना येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
रॅगिंगपासून लैंगिक छळापर्यंतचा आरोप
मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 18 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थिनी — हर्षिता, आकृती आणि कोमोलिका — यांनी तिच्यावर रॅगिंग करत मारहाण केली. या प्रकारानंतर तिच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक अशोक कुमार यांनी अश्लील वर्तन, मानसिक छळ आणि विरोध केल्यास धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
वडिलांचा आरोप आहे की सततच्या छळामुळे मुलगी मानसिकदृष्ट्या कोलमडली होती. धक्का बसलेल्या अवस्थेत असल्याने ते तत्काळ तक्रार दाखल करू शकले नाहीत. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली.
मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ ठरला निर्णायक
विद्यार्थिनीच्या मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तिने थेट प्राध्यापकावर अश्लील वर्तन, मानसिक छळ आणि धमक्यांचे आरोप केले आहेत. या व्हिडिओनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून पोलिस तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे.
पोलिसांचा खुलासा
कांगडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक रतन यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 75, 115(2) तसेच हिमाचल प्रदेश शैक्षणिक संस्था (रॅगिंग प्रतिबंधक) कायद्याच्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय नोंदी, व्हिडिओ पुरावे आणि सर्व संबंधितांचे जबाब तपासले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्प सेवा हेल्पलाइनवर सुरुवातीला तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली होती. मात्र विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याने तिचा जबाब नोंदवता आला नव्हता.
शैक्षणिक भवितव्य उद्ध्वस्त
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने 2024 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. रॅगिंग आणि छळामुळे ती बीए पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
आरोपी प्राध्यापकांचा बचाव
दरम्यान, आरोपी प्राध्यापक अशोक कुमार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काही शिक्षकांनीही त्यांचे समर्थन करत सांगितले की सदर विद्यार्थिनी सध्याच्या शैक्षणिक सत्रात त्यांची विद्यार्थिनी नव्हती. मात्र व्हायरल व्हिडिओ आणि कुटुंबीयांचे आरोप लक्षात घेता तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
न्यायाची मागणी तीव्र
या प्रकरणावर विद्यार्थी संघटनांनीही संताप व्यक्त केला आहे. एबीव्हीपीच्या राज्य सचिव नॅन्सी अटल यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले.
एका निष्पाप विद्यार्थिनीचा मृत्यू हा केवळ अपघात नाही, तर व्यवस्थेवर लागलेला गंभीर आरोप आहे. आता या प्रकरणात दोषींना शिक्षा होते का, की प्रकरण काळाच्या पडद्याआड जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
