शेतात जेवण करताना बिबट्याचा अचानक हल्ला; जीव वाचवताना तरुण विहिरीत कोसळला, बिबट्याचाही अंत

फुले शाहू आंबेडकर
0
सिन्नर /प्रतिनिधी : सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात बिबट्याच्या दहशतीने पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शेतात कामासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर जेवण करत असतानाच बिबट्याने अचानक हल्ला केला. जीवाच्या आकांताने पळताना तरुण थेट शेतातील विहिरीत पडला. त्याचा पाठलाग करत बिबट्यानेही विहिरीत उडी घेतली. या भीषण घटनेत तरुणासह बिबट्याचाही मृत्यू झाला.
शिवडी गावातील गोरख जाधव (तरुण शेतकरी) सकाळी शेतात कामासाठी गेला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास तो शेतातील विहिरीजवळ बसून जेवण करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या गोरखने जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाई-गडबडीत तो थेट शेतातील विहिरीत पडला.
धक्कादायक बाब म्हणजे गोरखचा पाठलाग करणाऱ्या बिबट्यानेही पाठोपाठ विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तात्काळ वन विभाग व पोलिसांना पाचारण केले. विहिरीत बिबट्या असल्याने गोरखला बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या.
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर जीवरक्षकांच्या मदतीने विहिरीच्या तळाशी गोरखचा शोध घेण्यात आला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. गोरखचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. काही वेळानंतर त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
या घटनेनंतर गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी बिबट्याला बाहेर काढण्यास विरोध केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बिबट्या तब्बल दोन ते तीन तास विहिरीतील पाण्यात अडकून राहिल्याने त्याचाही मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
धक्कादायक बाब म्हणजे याच बिबट्याने या घटनेच्या काही वेळ आधी आणखी एका नागरिकावर हल्ला केला होता. त्या जखमी नागरिकावर सध्या उपचार सुरू आहेत. सलग हल्ल्यांमुळे शिवडीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
बिबट्यांची वाढती दहशत, शेतकऱ्यांचे बळी आणि वन विभागाची अपुरी तयारी यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला असून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default